
मुंबईः महाराष्ट्राचा बहुतांश भाग उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळून निघत असतानाच पुढील दोन मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. एकीकडे उष्णतेचा चटका आणि दुसरीकडे काही भागात सायंकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आण दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट तसेच वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे.
कसे राहील पुढचे चार दिवस हवामान?
मंगळवार, २९ एप्रिलः लातूर जिल्ह्यात दिवसभर उन्हाच्या तडाख्यानंतर सायंकाळी विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
बुधवार, ३० एप्रिलः छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामान राहील. म्हणजेच उन्हाची तीव्रता अधिक राहील. तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
गुरुवार, १ मेः छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामान राहील.
तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल.
शुक्रवार, २ मेः मराठवाड्यातील जिल्ह्यात हवामान कोरडे राहील. परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर,गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात सोसाट्याच्या वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
शनिवार, ३ मेः मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, नाशिक घाट, नंदूरबार, धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
अतिउष्णतेच्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी काय करावे?
जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या (तहान लागली नसली तरीही), प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन (ORS) वापरा, लिंबू, पाणी, ताक/लस्सी आणि फळांचे रस यांसारखे घरगुती पेये घ्यावे. टरबुज, खरबुज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबीर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्या.
पातळ, सैल, सुती आणि शक्य तो हलक्या रंगाचे कपडे घालावे, तुमचे डोके झाकून ठेवा, थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री,टोपी,टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करावा, उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालाव्यात.
रेडिओ, टीव्हीवर प्रसारीत होणाऱ्या उष्णतेच्या लाटेबाबत बचाव उपायावर लक्ष द्या आणि स्थानिक हवामान बातम्यांसाठी वर्तमानपत्र वाचावीत, भारतीय हवामान विभागाच्या(IMD) website https://mausam.imd.gov.in यावर हवामान विषयी अद्ययावत माहिती घेत राहावे.
हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालावा, थंड हवा येण्यासाठी रात्री खिडक्या उघड्या कराव्यात, जर तुम्ही घराबाहेर जात असाल, तर तुमची घराबाहेरील कामे दिवसाच्या सकाळ आणि संध्याकाळ वेळेपर्यंत मर्यादित करावी, दिवसाच्या थंड वेळांमध्ये बाहेरील कामांचे नियोजन करावे.
संवदेनशील किंवा जास्त जोखीम असलेल्या लोकांसाठी
जरी कोणालाही उष्णतेचा ताण आणि उष्णतेशी संबंधित आजाराचा त्रास होऊ शकतो, तरी काही लोकांना इतरांतपेक्षा जास्त धोका असतो आणि त्यांच्याकडे अतिरिक्त लक्ष द्यावे.
समाविष्ट घटक: लहान अर्भक आणि लहान मुले, घराबाहेर काम करणारे लोक, गर्भवती महिला, मानसिक आजारपण असलेले व्यक्ती, शारीरिकदृष्ट्या आजारी, विशेषत: हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब, थंड हवामानापासून ते उष्ण हवामानापर्यंतच्या प्रवाशांनी त्यांच्या शरीराला उष्णतेला अनुकूल होण्यासाठी एक आठवडा वेळ द्यावा, जास्त श्रम टाळावेत आणि भरपूर पाणी प्यावे.
इतर खबरदारी: एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी व्यक्तीवर देखरेख ठेवली पाहिजे आणि त्यांच्या आरोग्याचे दररोज निरीक्षण केले पाहिजे, तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा, दिवसा खालच्या मजल्यावर राहण्याचा प्रयत्न करावा, शरीर थंड करण्यासाठी पंखा, स्प्रे बाटल्या, ओलसर कापड आणि बर्फाचे टॉवेल वापरावा, पाण्यात पाय बुडवल्याने निर्जलीकरण आणि शरीराची उष्णतेमुळे होणारी अस्वस्थता कमी होऊन जलद थंडावा मिळतो.
काय करु नये?
उन्हात बाहेर पडणे टाळा, विशेषत: दुपारी १२ ते ३ दुपारच्या वेळी बाहेर असताना कठोर परिश्रम टाळा, अनवाणी बाहेर जाऊ नका. अतिउष्णवेळेत स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक क्षेत्र पुरेशा प्रमाणात हवा येण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेले पेय टाळा, यामुळे शरीरातील पाणी कमी होते किंवा पोटात पेटके येऊ शकतात. उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका, उभ्या केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका.
