घ्या खबरदारी: २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान राज्यात पाऊस आणखी वाढणार, काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता


मुंबई: बंगालच्या उपसागरावर २४ सप्टेंबरला कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून २८ तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या आठवड्यात पाऊस परत सक्रिय होणार आहे. त्यामुळे किमान ३० सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून पाऊस निरोप घेण्याची शक्यता नाही. सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने दुपारनंतर पडेल.
कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव २६ तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. यादिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. २७ तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊसदेखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२८ सप्टेंबरला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

सतर्क रहा: नागरिकांना आवाहन

राज्यात सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे. नदीकाठच्या व कमी उंचीच्या भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. प्रशासनास व बचाव पथकांना सहकार्य करावे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त पथके व साधनसामग्री तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
संपर्क: राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय मुंबई ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९, ९३२१५८७१४३

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!