मुंबई: दहीहंडीच्या मुहूर्तावर राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला थोडासा दिलासा मिळाला आहे. पुढील दोन दिवस राज्याच्या बहुतांश भागात पाऊसधारा बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाड्यात आज शुक्रवारी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उद्या शनिवारपर्यंत (९ सप्टेंबर) पावसाचा जोर कायम राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये निर्माण झालेली चक्रीय वाऱ्याची स्थिती, पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा, अरबी समुद्रावरून येणारे वारे आणि मान्सूनचा आस मूळस्थितीपासून दक्षिणेकडे सरकल्यामुळे या स्थितीचा फायदा महाराष्ट्राला होत आहे.
या परिस्थितीमुळे उत्तर कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात शनिवार, ९ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आज शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रत्नागिरी, रायगडमध्ये सोमवार,११ सप्टेंबरपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ऑगस्टमध्ये महाराष्ट्राकडे पाठ फिरवलेला पाऊस सप्टेबरच्या पहिल्या आठवडम्यात परतला आहे. गुरूवारी दिवसभर पावसाचा जोर खूप नसला तरी राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली.
ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिल्यामुळे राज्याच्या अनेक भागात पावसाची मोठी तूट पडली. मध्य महाराष्ट्रात २४ टक्के, मराठवाड्यात २२ टक्के तर विदर्भात १२ टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रावर अजूनही दुष्काळाचे संकट कायम आहे.