मुंबईः मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनयानाचा ठसा उमटवणाऱ्या आणि सोज्वळ अभिनेत्री अशी ओळख निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यंचे आज निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. सीमा देव यांनी जवळपास ८० मराठी-हिंदी सिनेमात उल्लेखनीय भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
सीमा देव यांनी ‘आनंद’ या सिनेमात केलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका असलेल्या या सिनेमात सीमा देव यांची भूमिका छोटी होती, परंतु ती संस्मरणीय ठरली.
त्यांनी हिंदी आणि मराठी सिनेमात उत्तमोत्तम भूमिक साकारल्या. कालांतराने त्यांनी हिंदी सिनेमात काम करणे बंद करून केवळ मराठी सिनेमातच भूमिका स्वीकारायला सुरूवात केली होती.
सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. त्यांचे माहेरचे नाव नलिनी सराफ असे होते. सीमा देव यांनी सिनेमासृष्टीत प्रवेश केला तेव्हा दुर्गा खोटे, सुलोचना, ललिता पवार या अभिनेत्रींनी सिनेमासृष्टीत महिलांसाठी अभिनय क्षेत्राची वाट दाखवण्यास सुरूवात केली होती.
१९५७ मध्ये आलिया भोगासी या मराठी सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे सीमा देव यांनी भूमिका साकारलेले काही उल्लेखनीय चित्रपट आहेत.