मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगवेगळेच, अधिसूचना म्हणजे फायनल जीआर नाहीः प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा


मुंबईः मराठा समाजात नेहमीच दोन गट राहिले आहेत. ज्यांना निजामी मराठे म्हटले जाते, ते मुघलांबरोबर राहिले होते आणि जे आज आरक्षण मागत आहेत, ते रयतेतील मराठे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते. या दोघांमध्ये जात हा समान दुवा असला आणि मावळ्यांनी मोगलाई मराठ्यांना स्वीकारले असले तरी मोगलाई मराठ्यांनी रयतेतील मराठ्यांना स्वीकारलेले नाही, असे मोठे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगवेगळे आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा-ओबीसी समाज भिडलेले असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीव्ही९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना आरक्षणाच्या मुद्द्यावर महत्वपूर्ण भाष्य केले आहे.

रयतेचे मराठे आणि मोगलाई मराठे यांच्यात आजही रोटी-बेटी व्यवहार होत नाही. त्यांच्यात सामाजिक एकत्रिकरण झालेले नाही. त्यामुळे रयतेतील मराठे म्हणजेच गरीब मराठ्यांना वेगळे काढले जाऊ शकते का? तर तशी शक्यता आहे. पण त्यासाठी सत्ता हाती लागेल आणि त्यामुळेच जनतेने आम्हाला सत्ता द्यावी, असे आवाहन आम्ही करत आहोत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मराठा आरक्षणासंबंधी मुख्यमंत्र्यांनी काढलेली अधिसूचना कायदेशीर कसोटीवर टिकल्यानंतरच ती मान्य होईल. कारण ओबीसी आणि मराठा हे दोन गट एकमेकांविरोधात हरकती नोंदवत आहेत. मराठा समाजाची गेल्या ७० वर्षांतील सत्य परिस्थिती तपासून पहायली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाला मराठा समाजावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. त्या आवाहनाचा प्रकाश आंबेडकर यांनी निषेध केला आहे. ओबीसी आणि मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये कटुता आलेली आहे, हे नाकारून चालणार नाही. पण कोणत्याही समाजाचा नामोल्लेख करून अजून भांडणे वाढवणे ही वृत्ती अतिशय घातक आहे. मी त्याचा निषेध करतो. कारण वाळीत टाकणे आणि वाळीत राहणे हे मी स्वतः पाहिलेले आहे. मतभेद आहेत, हे मी मान्य करतो परंतु शत्रूत्व असता कामा नये, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

बाबासाहेबांनी १९२० मध्येच मागितले मराठा आरक्षण

एल्गार परिषदेत बोलताना ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी प्रकाश आंबेडकर हे आमच्या बाजूने आहेत, असे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपआपल्यापरिने उचलण्याचा प्रयत्न दिसतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमधील आपल्याला हवा तेवढाच भाग उचलला जातो. पूर्ण आंबेडकर कुणीही स्वीकारत नाही. १९२० मध्ये सायमन कमिशनला बाबासाहेबांनी जो खलिता सादर केला होता, त्यामध्ये रयतेतील मराठ्यांना इतरांप्रमाणेच सवलती मिळाल्या पाहिजेत, असे बाबासाहेबांनी म्हटले होते, अशी आठवण प्रकाश आंबेडकर यांनी करून दिली.

म्हणून मराठ्यांना आरक्षण ही बाबासाहेबांची भूमिका

मराठा ही ओळख निर्माण होत असताना भविष्यात त्याला राजकीय महत्व प्राप्त होईल. मोगलाई मराठे राजकारणात येतील आणि आपले वर्चस्व निर्माण करतील. परंतु रयतेच्या मराठ्यांना सोबत घेणार नाहीत. मोगलाईतील मराठे सर्वच स्वतःच्या ताब्यात ठेवून इतरांचा वापर करतील, असे बाबासाहेब आंबेडकर हे समाजशास्त्राचे अभ्यासक असल्यामुळे  त्यांच्या तेव्हाच लक्षात आले होते. त्यामुळे रयतेतील मराठ्यांना आरक्षण देण्याची त्यांची भूमिका होती. ज्या ज्या समाज घटकांना मदत लागेल, त्यांना मदत मिळवून देताना त्या त्या सरकारांना त्यांनी निवेदने दिली होती. असा ऐतिहासिक दाखलाही प्रकाश आंबेडकरांनी दिला.

अधिसूचना म्हणजे फायनल जीआर नव्हे!

ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे ताट वेगळे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचे ताट वेगळे आहे. ही सर्व प्रक्रिया कायदेशीर करावी लागणार आहे. कुणबी आधीच ओबीसीमध्ये आहेत. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, कुणबी संदर्भात आम्ही निर्णय घेतला आहे, मराठा समाजाचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोग घेणार आहे. त्यांचे वक्तव्य महत्वाचे आहे. त्यांनी काढलेल्या कुणबी अधिसूचनेमुळे मराठ्यांचा विषय पुढे गेलेला नाही. अजून जीआर फायनल झालेला नाही. १६ फेब्रुवारीपर्यंत त्यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत. त्यानंतरही अध्यादेश फायनल झाला तरी तो कायदेशीर प्रक्रियेत अडकणार आहे. या प्रकरणात ओबीसी आणि मराठा हे दोन्ही गट सहजासहजी ऐकणार नाहीत. सध्या काढलेली अधिसूचना म्हणजे फायनल जीआर नाही, असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केला.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!