मुंबईः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रविवारी त्यांचा ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि अन्य महत्वाच्या व्यक्ती आणि राजकीय नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांना द्वेष, मृत्यू आणि जातीयवादाचा सौदागर म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांनी सनातन धर्म, जातीयवादावर आक्रमक भूमिका घेतलेली पहायला मिळते आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केले आहे. ‘तुमच्या एका आघाडीवर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात आणि द्वेष, जातीयवाद आणि मृत्यूच्या सौदागराचा वाढदिवस साजरा करण्यात मश्गुल असलेले भाजप- आरएसएस आहेत, तर दुसऱ्या आघाडीवर मोहब्बत की दुकानचा झुनझुना वाजवणारी काँग्रेस आहे, पण आणचे काय? काही बदलले आहे काय?’ असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी या ट्विटमध्ये केला आहे.
‘पण आमचे काय? काही बदलले आहे काय? आम्ही भारतातील दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम सातत्याने कलंक, भेदाभेद आणि हिंसाचाराचा सामना करत जीवन जगत आहोत आणि अत्याचारपीडित, बहिष्कृत आणि उपेक्षित ठेवले गेलो आहोत, आमच्या स्त्रिया तर जगातील सर्वाधिक अत्याचारपीडित महिला आहेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
‘भाजप-आरएसएस आणि काँग्रेस या दोघांनाही भारतातील दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिमांची पर्वा नाही,’ अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी टिकास्त्र सोडले आहे. ‘या दोघांनाही दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिमांना सत्तेत वाटेकरी करून घ्यायचे नाही. त्यांना राजकीय सत्ता फक्त त्यांच्यामध्येच ठेवायची आहे,’ असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकरांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे थेट नाव घेतले नसले तरी त्यांनी द्वेष, मृत्यू आणि जातीयवादाचा सौदागर त्यांनाच म्हटले आहे. त्यामुळे आता भाजप यावर काय प्रतिक्रिया देते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.