मुंबईः सर्वात लोकप्रिय गणपती अशी ख्याती असलेला ‘लालबागचा राजा’ यंदा गणेशोत्सवाच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लालबागच्या राजाच्या गणपतीच्या पायावर बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा दाखवण्यात आली आहे. लालबागचा राजा गणेश मंडळाचा हा आगाऊपणा अनेकांना खटकला आहे. लालबागच्या राजाच्या पायावर शिवरायांची राजमुद्रा पाहून मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला असून लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
नवसाला पावणारा आणि सर्वात लोकप्रिय गणपती अशी लालबागच्या राजाच्या गणपतीची ख्याती आहे. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे गणेशोत्सवाच्या आधी यंदाही काहीवेळासाठी लालबागच्या राजाची मूर्ती नुकतीच सर्वांना दाखवण्यात आली. लालबागच्या राजाच्या मूर्तीची झलक पाहून काहीवेळातच या मूर्तीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या पायावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा दाखवण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर वादंगाला सुरूवात झाली आहे.
लालबागच्या राजाचे यंदाचे ९० वे वर्ष आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाने शिवराज्याभिषेकाचा देखावा साकारला आहे. त्याच अनुषंगाने लालबागच्या राजाची मूर्ती आणि आजूबाजूची सजावट करण्यात आली आहे. गणेश मूर्तीच्या पितांबरावर नक्षीकाम करण्यात आले आहे. या सजावटीमध्ये गणपती मूर्तीच्या पायावर शिवरायांच्या राजमुद्रेची प्रतिमा साकारणअयात आली आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
लालबागच्या राजाच्या पायावर शिवरायांची राजमुद्रा दाखवण्यात आल्याचे पाहून सकल मराठा समाज महाराष्ट्र आणि मराठा क्रांती महामोर्चा मुंबई यांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबईच्या पोलिस आयुक्तांना एक पत्र लिहिले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा लालबागचा राजाच्या पायावर दाखवण्याचा जो प्रयत्न मंडळाने केला, त्यांचा या मागचा नेमका हेतू काय होता, हे आम्हा शिव अनुयायांना कळत नाही. परंतु त्यांनी शिवराजमुद्रा लालबागच्या राजाच्या पायी छापून संपूर्ण शिव अनुयायांचा अवमान केला आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
लालबागचा राजा (गणपती बाप्पा) देव जरी असले तरी आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देव देव्हाऱ्यात आहेत आणि ही राजमुद्रा पायावर असणे मनाला पटत नाही. आपल्या स्वराज्याची राजमुद्रा मस्तकी लावावी पण पायावर पहायला मिळत आहे, याची खंत वाटत आहे. त्यामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.