मुंबईः आज भाजपने जी परिस्थिती शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केला आहे, उद्या ही परिस्थिती देशातील कोणत्याही पक्षावर ते आणू शकतात. आताच जर यांचा सामना केला गेला नाहीतर कदाचित आगामी २०२४ ची निवडणूक शेवटची ठरू शकेल. त्यानंतर देशात हुकुमशाहीचा नंगानाच सुरू होऊ शकतो, असा गर्भित इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मान्य नाही, असे सांगत त्यांनी निवडणूक आयोगच बरखास्त करण्याची मागणीही केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिंदे गटाने धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव चोरले आहे. हा पूर्वनियोजित कट होता. त्यांनी शिवसेना नाव चोरले असले तरी ते ठाकरे हे नाव चोरू शकत नाहीत. मी माँ आणि बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलो, हे माझे भाग्य आहे. हे भाग्य त्यांना मिळू शकत नाही. दिल्लीवाले त्यांना हे भाग्य देऊ शकत नाहीत, असे ठाकरे म्हणाले.
निवडणूक आयोगाचा निकाल एकांगी असून तो मानायला आपण तयार नाही. जेव्हा या वादाला सुरूवात झाली तेव्हा निवडणूक आयोगाने आम्हाला प्रतित्रापत्रे सादर करायला लावली होती. सदस्य संख्या दाखवा,असे सांगितले होते. मधल्या काळात चार-सहा महिने गेले. दरम्यान शिवसेनेने बोगस प्रतिज्ञापत्रे दिल्याच्या बातम्या आल्या. यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठिकठिकाणी जाऊन शपथपत्रे तपासली. त्यामध्ये असत्य असे काहीच नाही, सर्व कागदपत्रे योग्य आहेत, असा अहवाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आमच्याकडे रद्दी वाढली होती म्हणून नव्हे तर निवडणूक आयोगाने सांगितले होते म्हणून आम्ही ही प्रतिज्ञापत्रे सादर केली होती. आम्ही लाखोंनी उपद्व्याप केल्यानंतर अचानक निवडणूक आयोग म्हणायला लागले की प्रतिज्ञापत्रे चालणार नाहीत. तुमच्या पक्षाकडून निवडून आलेल्या सदस्यांच्या बहुमतानुसार पक्ष कुणाचा हे ठरवले जाईल. पण संबंधित आमदार पात्र आहेत की अपात्र याचा निर्णय आधी व्हायला पाहिजे. जर तुम्हाला हाच निकष लावायचा होता तर आम्हाला एवढी मेहनत का करायला लावली? आमच्या शिवसैनिकांना पदरमोड का करायला लावली? तुम्ही शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्रे का लिहून घेतली? असा सवाल ठाकरे यांनी केला.
निवडणूक आयोग बरखास्त कराः हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर आताचा निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे आणि निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले पाहिजेत, ही शिवसेनेची मागणी आहे. कारण हा निकाल मानायला मी तयार नाही. हा सरळ सरळ अन्याय आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
पक्षनिधीवर दावा कसा?: शिवसेनेच्या पक्षनिधीवर शिंदे गट दावा करू शकत नाही, असे सांगतानाच पक्षनिधीचा दावा ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, अन्यथा निवडणूक आयोगावर खटला भरला जाईल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. निवडणूक आयोगाला फक्त पक्षाचे नाव आणि चिन्ह ठरवण्याचा अधिकार नाही, तर देशात निवडणुका घेणे, पक्षांतर्गत लोकशाही जिवंत ठेवणे हा त्यांचा अधिकार आहे, असेही ठाकरे म्हणाले.