पुणेः राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्या जाहीर करण्यात आल्या असून २ मेपासून १४ जूनपर्यंत शाळांना उन्हाळी सुट्या असणार आहेत. नव्या शैक्षणिक वर्षासाठी विदर्भ वगळता राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत. विदर्भात मात्र १ जुलैपासून शाळा सुरू होतील.
राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्यांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणि सुसंगती रहावी यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या संचालकांनी शाळांच्या उन्हाळी सुट्यांबाबत संयुक्त परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात उन्हाळी सुट्यांचा कालावधी आणि २०२४-२५ हे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. राज्य मंडळ वगळता इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास किंवा या शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास अशा शाळांच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या जाहीर करण्याबाबत उचित निर्णय घ्यावा, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
२०२४-२५ या नवीन शैक्षणिक वर्षात राज्य मंडळाच्या शाळा १५ जूनपासून सुरू करण्यात याव्यात. विदर्भातील तापमान लक्षात घेऊन उन्हाळी सुट्यानंतर तेथील राज्य मंडळाच्या शाला ३० जून रोजी रविवार येत असल्यामुळे १ जुलैपासून सुरू कराव्यात, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.