विद्यापीठात अग्नीतांडव, यूजीसी शिक्षक प्रशिक्षण केंद्राच्या गेस्ट हाऊस परिसरात मोठी आग


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात आज रात्री (१८ एप्रिल) बारा वाजेच्या सुमारास अचानक मोठी आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्नीशमन दलाच्या पथकाने सुमारे अर्ध्या तासानंतर ही आग आटोक्यात आणली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात कुलगुरूंच्या बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या यूजीसी मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्राच्या गेस्ट हाऊस परिसरात रात्री ११ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास अचानक आग लागली. अचाानक लागलेल्या या आगीमुळे या गेस्ट हाऊस शेजारीच असलेल्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आणि ते भीतीपोटी मैदानात आले. त्यांनीच सुरूवातीला ही आग विझवण्याचा प्रयत्न केला.

पाहता पाहता आगीने विक्राळ रुप धारण केले आणि आगीचे मोठेच्या मोठे लोळ उठू लागले. या आगीची खबर मिळताच महानगर पालिकेचे अग्नीशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन पथकाने रात्री १२.२५ वाजेच्या सुमारास ही आग आटोक्यात आणली.

विशेष म्हणजे विद्यापीठ परिसरात आगीची ही घटना घडूनही विद्यापीठ परिसराच्या पालकत्वाची जबाबदारी असलेले कुलसचिव घटनास्थळी फिरकलेही नाहीत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या आगीमुळे विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहा व्हिडीओ-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!