महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा सर्वांनाच मिळणार लाभ, खर्चाची मर्यादाही ५ लाखांपर्यंत; वाचा कसा होईल फायदा?


मुंबई: महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार असून या योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रतिकुटुंब प्रतिवर्ष दीडलक्ष रूपयांवरून ५ लक्ष रूपये एवढे करण्याचा निर्णय २८ जून रोजी  झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार एकत्रित योजना अंमलबजावणीचा शासन निर्णय २८ जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. 

योजनेची वैशिष्ट्ये:

  • राज्यात यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र यापुढे राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र प्राप्त नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त झाले आहे. अशाप्रकारे केंद्र व राज्याची एकत्रित योजना राबवणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे.
  • आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रतिकुटुंब प्रती वर्ष ५ लक्ष रूपये आहे. आता महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गतही आरोग्य संरक्षण प्रतिकुटुंब प्रतिवर्ष ५ लक्ष रूपये एवढे करण्यात आले आहे.
  • आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट उपचारांचा लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे. तसेच दोन्ही योजनांच्या अंगीकृत रूग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहे.
  • महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये ९९६, तर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये १२०९ उपचार आहेत. यापैकी मागणी नसलेले १८१ उपचार वगळण्यात आले आहे, तर मागणी असलेले ३२८ उपचारांचा समावेश नव्याने करण्यात येत आहे.
  • प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत उपचारांची संख्या १४७ ने वाढून १३५६ एवढी झाली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत पण १३५६ एवढे उपचार समाविष्ट करण्यात येत आहे.
  • महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उपचारांची संख्या ५६० ने वाढवण्यात येत आहे. या १३५६ उपचारांपैकी ११९ उपचार केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव राहतील.
  • महात्मा फुले जनआरोग्य व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रूग्णालयांची संख्या १००० एवढी आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना ही याआधीच महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागात लागू करून सीमेलगतच्या महाराष्ट्र राज्यातील ८ जिल्ह्यांत १४० व कर्नाटक राज्यातील १० अतिरिक्त रूग्णालये अंगीकृत करण्याचा निर्णय झाला आहे.
  • याव्यतिरिक्त २०० रूग्णालये अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता अंगीकृत रुग्णालयांची संख्या 1१३५० होईल. यामध्ये सर्व शासकीय रुग्णालय अंगीकृत करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त यापुढे मागास भागात नव्याने सुरू होणारी सर्व रुग्णालये, अशा रुग्णालयांची ईच्छा असल्यास या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत करण्यात येतील.
  • मूत्रपिंड शस्त्रक्रीयेसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रतिरूग्ण २.५ लक्ष एवढी मर्यादा आहे. ती आता ४.५ लक्ष रूपये एवढी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या १४ ऑक्टोंबर २०२० च्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करून रस्ते अपघातासाठीची उपचारांची संख्या ७४  वरून १८४ अशी वाढविण्यात आली आहे. उपचाराच्या खर्च मर्यादेत ३०  हजार रूपयांवरून प्रतिरूग्ण प्रतिअपघात १ लक्ष रूपये अशी वाढ करण्यात आली आहे.
  • या योजनेचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला आहे. यामध्ये राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील रस्ते अपघातात जखमी झालेल्या, राज्यातील व देशातील रूग्णांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *