
मुंबईः सध्या राज्यभर गाजत असलेल्या बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात केवळ पगारपत्रकावर स्वाक्षऱ्या केल्यामुळे काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्यामुळे अधिकाऱ्यांनी पगारपत्रकावर स्वाक्षऱ्याच न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रखडले होते. आता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या संघटनेला राज्य सरकारकडून आश्वासन मिळाल्यामुळे येत्या दोन दिवसांत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारपत्रकावर स्वाक्षऱ्या करण्याचा निर्णय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नागपूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून उघडकीस आलेल्या बोगस वैयक्तिक मान्यता व बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरलेली असण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) या घोटाळ्याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. या एसआयटीच्या चौकशीत अनेक गैरप्रकार उघडकीस येत असून पुढील काही महिने एसआयटीची ही चौकशी सुरू राहणार आहे. या प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून काही अधिकारी निलंबितही करण्यात आले आहेत.
एसआयटीच्या तपासादरम्यान केवळ पगारपत्रकावर स्वाक्षऱ्या केल्यामुळे काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे शिक्षण विभागातील अधिकारी संतप्त झाले होते. कोणतीही शहानिशा न करताच केवळ पगारपत्रकावर स्वाक्षऱ्या केल्यामुळे निरपराध अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने केला होता. केवळ पगारपत्रकावर स्वाक्षरी केल्यामुळे कारवाई केली जात असेल तर आम्ही पगारपत्रकावर स्वाक्षऱ्याच करणार नाही, अशी भूमिका राजपत्रित अधिकारी संघाने घेतली होती. पगारपत्रकावर स्वाक्षरी केल्यामुळे डिसेंबर २०२५ मध्ये यवतमाळ येथील एका अधिकाऱ्यास अटक केल्यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी पगारपत्रकावर स्वाक्षऱ्या करण्यावर बहिष्कार टाकला होता.
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या या भूमिकेविरोधात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटांनी शड्डू ठोकले होते. एसआयटीच्या आदेशावरूनच आम्ही पगारपत्रकावर स्वाक्षऱ्या करत नसल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. परंतु अशा पद्धतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा त्रास दिला जाणार असेल तर आम्ही शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही, असा इशारा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी दिला होता.
या प्रकाराची तीव्रता आणि राज्यभरातील लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात राज्य सरकारने बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने पुढील दोन दिवसांत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारपत्रकांवर स्वाक्षऱ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही बैठक होणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी पगारपत्रकावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगाराची रक्कम जमा होणार आहे.
