
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास सध्या विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) सुरू असून नागपूर, नाशिकनंतर ही एसआयटी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या झाडाझडतीसाठी येणार असल्यामुळे शालार्थ आयडी आणि संचिकांच्या पडताळणीत छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने २०१९ ते २०२४ या सहा वर्षांच्या काळात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तब्बल १० हजार ६० शालार्थ आयडी मंजूर केल्याची धक्कादायक बाब समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात मार्च २०२० ते जून २०२१ शाळा आणि नोकर भरती बंद असतानाच्या काळातही हे शालार्थ आयडी जारी करण्यात आले आहेत. या सर्वच प्रकरणांची एसआयटीकडून झाडाझडती घेण्यात येणार असल्यामुळे अनेक विभागीय शिक्षण उपसंचालक कारवाईच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
नागपूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून पहिल्यांदा बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचे बिंग फुटले. प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचे आदेश तसेच शालार्थ आयडी प्रदान करण्याच्या आदेशांची कोणतीही शहानिशा न करताच बनावट शालार्थ आयडी प्रदान करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार या घोटाळ्यातून समोर आल्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरलेली असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने या घोटाळ्याची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली ७ ऑगस्ट २०२५ रोजी एसआयटीची स्थापना करण्यात आली.
ही एसआयटी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या अनुदानित आणि अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी मान्यता, सेवासातत्य आणि विनाअनुदानित पदावरून अनुदानित पदावर केलेल्या बदल्यांची झाडाझडती घेत आहे. २०१२ ते २०२४ पर्यंतच्या सर्व प्रकरणांचा तपास एसआयटीमार्फत केला जात आहे.
आता ही एसआयटी छत्रपती संभाजीनगर शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडीचा तपास करण्यासाठी येणार आहे.
पुढील आठवड्यात एसआयटीच्या तपासाचा फेरा येणार असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयांकडून संचिकांची पडताळणी करून नियमानुसार सर्व कागदपत्रे आहेत का? वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी दिलेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या, मंजूर पदांची संख्या आणि त्यासंख्येनुसार संचिका उपलब्ध आहेत की नाही? याची पडताळणी केली जात आहे. तसेच या संचिकांचे डिजिटायझेशनही करण्यात येत आहे.
शालार्थ आयडी आणि संचिकांच्या पडताळणीच्या प्रक्रियेत छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या शालार्थ आयडीची संख्या डोळे दिपवून टाकणारी आहे. २०१९ ते २०२४ या अवघ्या सहाच वर्षांच्या काळात या कार्यालयाकडून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तब्बल १० हजार ६० शालार्थ आयडी जारी करण्यात आल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयस्तरावरून प्राथमिक व माध्यमिक शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी जारी केले जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ ते २०२५ या काळात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जारी केलेल्या शालार्थ आयडींची संख्या अशीः
२०१९ ते २०२२ पर्यंतचे जिल्हानिहाय शालार्थ आयडी
- छत्रपती संभाजीनगर जिल्हाः प्राथमिक-६३७, माध्यमिक-८१७
- जालना जिल्हाः प्राथमिक-२२४, माध्यमिक-६६६
- बीड जिल्हाः प्राथमिक-४५४, माध्यमिक-६३६
- परभणी जिल्हाः प्राथमिक-३७१, माध्यमिक-७३२
- हिंगोली जिल्हाः प्राथमिक-१४४, माध्यमिक-२७७
२०२२ ते २०२५ पर्यंतचे जिल्हानिहाय शालार्थ आयडी
- छत्रपती संभाजीनगर जिल्हाः प्राथमिक-१०६३, माध्यमिक-८६३
- जालना जिल्हाः प्राथमिक-१६९, माध्यमिक-४३२
- बीड जिल्हाः प्राथमिक-४६३, माध्यमिक-७९७
- परभणी जिल्हाः प्राथमिक-३५८, माध्यमिक-४८८
- हिंगोली जिल्हाः प्राथमिक-१६५, माध्यमिक-३०६
कोरोना लॉकडाऊनमध्ये दिले तब्बल ४ हजार आयडी?
कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे महाराष्ट्रात मार्च २०२० ते ३० एप्रिल २०२१ पर्यंत लॉकडाऊन आणि जून २०२१ पर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध लागू होते. या काळात शाळा-महाविद्यालये, शासकीय कार्यालये बंद होती. नोकर भरतीही बंद होती. तरीही या काळात छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तब्बल ४ हजार शालार्थ आयडी जारी करण्यात आल्याची चर्चा आहे. या जारी करण्यात आलेल्या शालार्थ आयडीपैकी अनेक संचिकाच गायब असल्याचे सांगण्यात येते. त्यांचीही झाडाझडती एसआयटीमार्फत घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
२०१२ ते २०२४ या कालावधीत छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या शालार्थ आयडींची संख्या पाहता या आठ वर्षांच्या कालावधीतील तत्कालीन शिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी आणि विभागीय शिक्षण उपसंचालक एसआयटीच्या कारवाईच्या फेऱ्यात अडकण्याच्या शक्यतेने शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या कालावधीतील शालार्थ आयडी कोणाचे?
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे भारतात २२ मार्च २०२० रोजी १४ तासांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आणि त्यानंतर पहिल्यांदा २५ मार्च २०२० रोजी २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला. १४ एप्रिल रोजी या लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन १५ एप्रिल ते ३ मे २०२० पर्यंत, तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन ४ ते १७ मे २०२० पर्यंत आणि चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन १८ ते ३१ मे २०२० पर्यंत लागू करण्यात आला. भारत सरकारने १ जून २०२० रोजी देशव्यापी लॉकडाऊन उठवला आणि काही निर्बंध लागू करत अनलॉकचा टप्पा सुरू केला. ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत हे टप्पे चालले. परंतु महाराष्ट्रात लॉकडाऊनचे निर्बंध ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्यात आले.
फेब्रुवारी २०२१ मध्ये भारतातील कोराना बाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात लॉकडाऊन लागू करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही हा लॉकडाऊन २८ फेब्रवारी २०२१ पर्यंत लागू होता. महाराष्ट्रात मार्च २०२१ पर्यंत कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय वाढल्याने ५ एप्रिल २०२१ रोजी पुन्हा राज्यव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला. शाळा-महाविद्यालये व कार्यालये बंद करण्यात आली. हा लॉकडाऊन ३० एप्रिल २०२१ पर्यंत चालला. परंतु १ जून २०२१ पर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध लागू होते. या कालावधीत जारी झालेले शालार्थ आयडी कोणाचे? त्यांच्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी मंजुरीचे आदेश आणि संचिका उपलब्ध आहेत का? याचा शोधही एसआयटी घेणार आहे.
