नागपुरात भाजपला मोठा धक्काः महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले ७ हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी!


नागपूरः महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ महाविकास आघाडीने खेचून घेतला आहे. भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार नागोराव गाणार यांचा पराभव करत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांनी पहिल्या पसंतीक्रमावरच विजयासाठी निश्चित केलेला कोटा पूर्ण केला. त्यांना पहिल्या पसंतीची १४ हजार ७१ मते मिळाली तर भाजपचे उमेदवार नागोराव गाणार यांना पहिल्या पसंतीची केवळ ६ हजार ३०९ मते मिळाली. सुधाकर आडबाले यांनी ७ हजाराहूंन अधिक मताधिक्याने विजयावर शिक्कामोर्तब केले आहे.

 गेल्या दहा वर्षांपासून नागपूर शिक्षक मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. विद्यमान आमदार नागोराव गाणार यांनी यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही गाणार यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले यांनी निर्णायक आघाडी घेतली. आडबालेंची आघाडी नागोराव गाणार यांना तोडताच आली नाही. पहिल्या पसंतीच्या मतांवरच आडबाले यांनी विजयश्री खेचून घेतली. आडबाले यांचा विजय आणि नागोराव गाणार यांचा पराभव ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठी नामुष्की मानली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!