ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. सीताराम येचुरी यांचे निधन, डाव्या चळवळीचा बुद्धिजीवी चेहरा काळाच्या पडद्याआड


नवी दिल्लीः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. श्वसन मार्गात संसर्ग झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. मात्र गुरूवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७२ वर्षांचे होते. सीताराम येचुरी यांच्या निधनामुळे कम्युनिस्ट पक्षाचा एक बुद्धिजीवी चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे.

न्युमोनिया, छातीत संसर्ग झाल्यामुळे १९ ऑगस्टपासून सीताराम येचुरी यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सीताराम येचुरी हे भारताच्या राजकारणातील डाव्या विचारप्रवाहातील एक महत्वाचे नेते होते. १९७४ मध्ये ते स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआयमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर वर्षभरातच त्यांनी माकपमध्ये प्रवेश केला. १९९२ पासून ते माकपच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य होते. २००५ ते २०१७ अशी १२ वर्षे त्यांनी पश्चिम बंगालमधून राज्यसभेचे खासदार होते.

सुमारे ५० वर्षांपूर्वी विद्यार्थी राजकारणाच्या माध्यमातून देशाच्या राजकारणात पाऊल ठेवणारे सीताराम येचुरी हे २०१५ मध्ये प्रकाश कारत यांच्यानंतर माकपचे महासचिव बनले होते. येचुरी हे दिवंगत माकप नेते हरकिशनसिंह सुरजित यांच्या पठडीत तयार झालेले नेते होते. सुरजित यांनी युती-आघाडी युगातील सरकारमध्ये महत्वाची भूमिका निभावली होती. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सर्वात प्रथम व्ही. पी. सिंगांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आघाडीचे सरकार आणि १९९६-९७ मध्ये संयुक्त आघाडी सरकारच्या काळात दोन्ही सरकारांना माकपने बाहेरून पाठिंबा दिला होता.

जेव्हा डाव्या पक्षांनी पहिल्या यूपीए सरकारला पाठिंबा दिला आणि धोरण निश्चितीच्या मुद्यांवर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारवर कायम दबाव राखला, तेव्हा सीताराम येचुरी यांचे राजकीय कौशल्य आणि कसब अधिक प्रकर्षाने उठून दिसले होते. त्यांनी भारत अमेरिका अणु कराराबाबत सरकारशी चर्चेमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावली होती.

सीताराम येचुरी हे दिल्लीतील सेंट स्टिफन कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) विद्यार्थी होते. जेएनयूमध्ये ते अर्थशास्त्रात पीएच.डी. करत असताना १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी घोषित केली, तेव्हा अन्य अनेक नेत्यांबरोबरच येचुरी यांनाही अटक करण्यात आली होती. नंतर त्यांनी राष्ट्रीय राजकारणात महत्वाची भूमिका निभावली. मात्र त्यांची अर्थशास्त्रातील पीएच.डी. अपूर्णच राहिली.

तुरूंगातून बाहेर आल्यानंतर येचुरी सलग तीनवेळा जेएनयू छात्र संघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.याच दरम्यान त्यांची भेट प्रकाश कारत यांच्याशी झाली. नंतर हे दोघेही आजम्न एकमेकांसोबत राहिले. येचुरी हे अभ्यासू आणि बुद्धिजीवी मार्क्सवादी नेते म्हणून सर्वपरिचित होते.

राहुल गांधींनी व्यक्त केला शोक

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सीताराम येचुरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सीताराम येचुरीजी एक मित्र होते. देशाची सखोल माहिती ठेवणारे आणि भारताच्या विचाराचे संरक्षक होते. ज्या पद्धतीने आम्ही चर्चा करत होतो, त्या आता मला करता येणार नाहीत. दुःखाच्या या प्रसंगी त्यांचा परिवार, मित्र आणि अनुयायांप्रति माझ्या संवेदना, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!