पुणेः पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्या साडीने आज अचानक पेट घेतला. वेळीच ही बाब लक्षात आल्यामुळे लगेचच आग विझवण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही.
पुण्यातील हिंजवडी परिसरात एका कराटे प्रशिक्षण संस्थेचे आज उद्घाटन करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या वेळी दीपप्रज्वलन करण्यात आले.
दीपप्रज्वलनानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत असतानाच तेथे ठेवण्यात आलेल्या दीव्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला.
सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानक पेट घेतल्याची बाब कार्यकर्त्यांच्या वेळीच लक्षात आल्यामुळे ही आग वेळीच विझवण्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली.
या घटनेनंतरही सुप्रिया सुळे या कार्यक्रमातून निघून गेल्या नाहीत. त्या तिथेच थांबल्या. त्यांनी भाषणही केले. तुम्ही फिट राहिलात तर तुम्ही आनंदी राहू शकता. स्टे फिट, स्टे हेल्दी, स्टे हॅप्पी. कारण फिटनेस जिंकण्यासाठी नाही तर स्वतःच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. जळालेली साडी घालूनच त्यांनी कराटेची प्रात्यक्षिकेही पाहिली. या कार्यक्रमानंतर त्यांचे दिवसभराचे पूर्वनियोजित कार्यक्रमही त्यांनी केले. या घटनेचा पहा व्हिडीओ