बोगस पदवी प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्याची कुलगुरूंना सदबुद्धी दे, विद्यापीठात रिपाइंचे साष्टांग दंडवत आंदोलन; ‘आर्थिक व्यवहार की…?’


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी आणि विद्यापीठाच्या अन्य उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना सद्बुद्धी सूचावी आणि त्यांनी वाराणसी विद्यापीठाच्या बनावट व खोट्या पदव्यांच्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश घेऊन फसवणूक करणाऱ्या दोषीविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी रिपाइंच्या (आठवले) वतीने आज विद्यापीठ गेटवर साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात आले.

सिद्दीकी मोहम्मद शोएब मोहम्मद हबीबुद्दीन याने वाराणसी येथील महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या बी.एससी. व एम.एससी.ची बनावट गुणपत्रके आणि पदव्या तयार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राणीशास्त्र विषयात पीएच.डी.ला प्रवेश मिळवल्याची तक्रार रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी १५ मे २०२५ रोजी कुलगुरू विजय फुलारी यांच्याकडे केली होती.

या तक्रारीच्या आधारे विद्यापीठाने वाराणसीच्या महात्मा गांधी काशी विद्यापीठाकडे मोहम्मद शोएबच्या पदव्यांची पडताळणी करून मागितली असता शोएबच्या बी.एससी. आणि एम.एससी.च्या गुणपत्रिका व पदव्या बनावट असल्याचे ३० जून कळवण्यात आले.

महात्मा गांधी काशी विद्यापीठाकडून पडताळणी झाल्यानंतर विद्यापीठाने ८ जुलै २०२५ रोजी सिद्दीकी मोहम्मद शोएब मोहम्मद हबीबुद्दीनची पीएच.डी.ची नोंदणी रद्द केल्याचे पत्राद्वारे कळवले. परंतु त्याच्या विरोधात विद्यापीठाची फसवणूक करून पीएच.डी.ला प्रवेश मिळवल्याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली नाही. अशाच प्रकरणात आस्मा खान व मकसूद खान या दोघांच्या विरोधात मात्र विद्यापीठाने आधी बेगमपुरा पोलिस ठाण्यात २६ मार्च २०२५ रोजी फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आणि नंतर त्यांची पीएच.डी.ची नोंदणी रद्द केली होती.

आस्मा खान व मकसूद खानप्रमाणेच मोहम्मद शोएबविरुद्धही कारवाई होणे अनिवार्य असताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी.एन. डोळे यांनी संगनमताने मोहम्मद शोएबला अभय देण्याची भूमिका घेतली. विद्यापीठ प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेच्या विरोधात आणि दोषींविरुद्ध समान न्यायाने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची सद्बुद्धी त्यांना सूचावी म्हणून आज रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांच्या नेतृत्वात विद्यापीठात साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात आले.

विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना हाताशी धरून नेहमीप्रमाणे हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बेगमपुरा पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. परंतु तरीही आंदोलनावर ठाम राहून गायकवाड यांच्या नेतृत्वात विद्यापीठ गेटपासून या साष्टांग दंडवत आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. हे आंदोलक विद्यापीठ गेटपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या दिशेने वाय पाँइंटकडे निघाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडवले आणि बेगमपुरा पोलिस ठाण्यात नेले. तेथे प्रतिबंधात्मक कारवाई करून आंदोलकांना सोडून देण्यात आले. आता तरी कुलगुरू डॉ. विजय फुलारींना सद्बुद्धी सूचावी आणि त्यांनी आस्मा खान व मकसूद खान यांच्याप्रमाणेच मोहम्मद शोएबविरुद्धही पोलिसांत फिर्याद देऊन गुन्हा दाखल करावा, अशी अपेक्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

या आंदोलनात नागराज गायकवाड यांच्यासह प्रशांत वाहुळे, विकास राऊत, अश्वीन मेश्राम, मंगेश भवरे, नितीन कांबळे, सिद्धार्थ खोतकर, अनिल आगळे, आनंद शिंदे, किरण मगरे, नितीन साळवे, चेतन जाधव इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आर्थिक व्यवहार की धमकीची दहशत?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या आदेशाने एम.फिल.च्या बनावट पदव्यांच्या आधारे पीएच. डी.ला प्रवेश घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी आस्मा खान व मकसूद खान यांच्याविरूद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात तातडीने गुन्हा नोंदवण्यात आला. मोहम्मद शोएब सिद्दिकीनेही तशीच फसवणूक करून पीएच.डी.ला प्रवेश मिळवलेला असताना विद्यापीठ प्रशासनाने त्याची फक्त पीएच.डी. ची नोंदणी रद्द केली पण गुन्हा दाखल करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे. मोहम्मद शोएब सिद्दिकीशी आर्थिक व्यवहार झाल्यामुळे ही टाळाटाळ केली जात आहे की त्याने कुलगुरूंसह विद्यापीठातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना धमकी देऊन दहशत निर्माण केल्यामुळे? असा सवाल नागराज गायकवाड यांनी न्यूजटाऊनशी बोलताना केला.

सारख्याच गुन्ह्यात वेगळे निकष कसे?

शोएब प्रकरणात कुलगुरू आणि विद्यापीठातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्यामुळे या एकूणच प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. शोएबच्या निमित्ताने आस्मा खान व मकसूद खानवर नोंदवलेला गुन्हा ही चूक झाल्याचे विद्यापीठाला वाटत असेल तर तो गुन्हा मागे घ्यावा किंवा शोएबविरूद्ध तरी गुन्हा दाखल करावा. सारख्याच गुन्ह्यात वेगवेगळे निकष आणि मापदंड कसे काय लावू शकता?, असल्याचे नागराज गायकवाड यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!