छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात रामनवमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून अशा कार्यक्रमांच्या आयोजनाला परवानगी देऊन विद्यापीठ प्रशासन धर्मांधतेला खतपाणी घालत असल्याचा आरोप पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे. प्रशासनाने हा कार्यक्रम रद्द केला नाही तर ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होईल, त्याच ठिकाणी कंदुरीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
देशात २०१४ पासून उच्च शिक्षणाचे भगवीकरण आणि हिंदुत्वाचे उदात्तीकरण करून उच्च शिक्षणाचे क्षेत्र नासवण्याचे जोरकस प्रयत्न होत आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात ३० मार्च रोजी श्रीरामनवमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्रीरामनवमी निमित्त आर्ट ऑफ लिव्हिंगचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक ऋषी देवव्रतजी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून मर्यादा पुरूषोत्तम राम आणि जीवन जगण्याची कला असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.
गुरूवार,३० मार्च रोजी विद्यापीठाच्या नाट्यगृहात प्रसिद्ध उद्योजक व सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राम भोगले यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर अधिसभा सदस्य प्रा. सुनिल मगरे आणि देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या आयोजनाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनालाच आक्षेप घेतला आहे. प्रशासनाने विद्यापीठ परिसरात अशा धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाला परवानगी दिलीच कशी? असा आक्षेप घेतला जात असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे चालणाऱ्या या विद्यापीठाचे जाणीवपूर्वक भगवीकरण आणि धर्मांधीकरण करण्याचा हा घाट असल्याची टीका हे कार्यकर्ते करू लागले आहेत.
…तर सतीश चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली कंदुरी करू
रामनवमीच्या या कार्यक्रमाला दिलेली परवानगी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी रद्द केली नाही तर आमदार सतीश चव्हाण यांनाच अध्यक्ष करून विद्यापीठ नाट्यगृहात कंदुरीचा कार्यक्रम आयोजित करू, असा इशारा विद्यार्थी नेते लोकेश कांबळे यांनी दिला आहे. हाच का तो राम ज्याने शंभुकाची हत्या केली होती? विद्यापीठात बहुजन समाजातील मुले शिकतात. आमच्या आदर्शाची हत्या करणाऱ्या रामाला आमचा विरोध आहे. कुलगुरूंनी या कार्यक्रमाची परवानगी नाकारली नाही तर आम्ही पण सतीश चव्हाण यांना अध्यक्ष करून विद्यापीठ नाट्यगृहात कंदुरीचा कार्यक्रम आयोजित करू. कुलगुरू, प्र-कुलगुरू व सर्व अधिसभा सदस्यांना आमंत्रित करू. बघा तुमच्या हातात आहे काय करायचे? असा इशारा लोकेश कांबळे यांनी दिला आहे.
…तर कार्यक्रम उधळून लावणार
धार्मिक उन्मादाला खतपाणी घालणारा हा कार्यक्रम विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ रद्द करावा, अन्यथा आम्ही हा कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा दी आंबेडकराईट मूव्हमेंटचे समन्वयक विजय वाहुळ यांनी दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला धर्माचा आखाडा होऊ देणार नाही. तुमचे धार्मिक कार्यक्रम विद्यापीठ परिसराच्या बाहेर घ्या. पोलीस आयुक्त व प्रशासनाने हा कार्यक्रम तत्काळ रद्द करावा, अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असे वाहुळ यांनी म्हटले आहे.
परिवर्तनवादी महापुरुषांचे आम्ही अनुयायी आहोत. त्यामुळे ज्ञानार्जनाच्या ठिकाणी होऊ घातलेला धार्मिक उन्माद आम्ही सहन करणार नाही. प्रत्येकाला आप आपल्या धार्मिक मुक्त प्रगटी करणाचा अधिकार आहे परंतु ते आपल्या खाजगी जीवनात याप्रकारे जर षड्यंत्र करून जर शहराचे स्वास्थ खराब करण्याचा प्रयत्न होत असेल तर तो पोलीस यंत्रणेने त्वरीत रोखावा. संघी पायंडा पाडण्याची वृत्ती आम्ही ओळखून आहोत,प्रशासनाने तात्काळ याला आवर घालावी अन्यथा कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न झाला तर तो उधळून लावला जाईल, असा इशारा विजय वाहुळ यांनी दिला आहे.
विरोध केला म्हणून पोलिसांनी बजावली नोटीस
दरम्यान, विजय वाहुळ यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाला विरोध केल्यामुळे पोलिसांनी त्यांना सीआरपीसीच्या कलम १४९ अन्वये प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. हा कार्यक्रम विद्यापीठ प्रशासनाची अंतर्गत बाब असल्याचेही या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कोणतेही वर्तन करू नये, असेही वाहुळ यांना बजावण्यात आले आहे. या नोटिशीवरही वाहुळ यांनी आक्षेप घेतला आहे. विद्यापीठ प्रशासन आणि पोलिस प्रशासन या दोन्ही शासकीय प्राधिकरणात मोडणाऱ्या संस्था आहेत. त्यामुळे संविधानाचे कलम २८ व कलम ५१ अ यांचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी या दोन्ही संस्थांनी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करत लोकशाही मार्गाने लढा सुरूच राहील, असा इशारा वाहुळ यांनी दिला आहे.