Breaking News: विद्रोही कवयित्री प्रतिभा अहिरे यांची ‘मसाप’च्या निवडणुकीतून माघार, ‘न्यूजटाऊन’च्या भूमिकेचा मोठा विजय!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): प्रसिद्ध विद्रोही कवयित्री प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी मराठवाडा साहित्य परिषद अर्थात मसापच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. न्यूजटाऊनने ‘मसापच्या निवडणुकीत आरएसएसच्या ‘दांड्या’वर परिवर्तन मंचचा ‘झेंडा’, आंबेडकरवाद्यांचा ‘विद्रोह’ही संघाच्या दावणीला? या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे आंबेडकरी- विद्रोही साहित्यिक- कवींच्या एकूणच भूमिकेवर चर्चा घडून आली. न्यूजटाऊनने काही मूलभूत प्रश्नही उपस्थित केले होते. आज अखेर प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे निवेदन न्यूजटाऊनकडे पाठवले आहे.

मराठवाडा साहित्य परिषद अर्थात मसापच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक आणि आरएसएस-भाजपप्रणित विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक डॉ. सर्जेराव जिगे हे परिवर्तन मंचचे पॅनलचे नेतृत्व करत असून त्यांच्या नेतृत्वात प्रसिद्ध विद्रोही कवयित्री प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे, आंबेडकरी कवि-लेखक प्रा. डॉ. सिद्धोधन कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. मोहन सौंदर्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त कवी- लेखक बबन मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या आंबेडकरी-विद्रोही साहित्यिक-कवींच्या संघासोबत जाण्याच्या बाबतीत न्यूजटाऊनने काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी त्यांची भूमिकाही मांडली होती. त्यांनी मांडलेल्या भूमिकेत न्यूजटाऊनने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे नव्हती. ती उत्तरे त्यांच्यासह आरएसएस-भाजपप्रणित परिवर्तन मंचमध्ये असलेल्या सर्वच आंबेडकरी-विद्रोही साहित्यितक- कवींनी द्यावी, असे खुले आव्हान न्यूजटाऊनने दिले होते. त्याला कोणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. आज अखेर प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी न्यूजटाऊनकडे पाठवलेले निवदेन त्यांच्याच शब्दात-

‘मी या निवेदनाद्वारे कळवित आहे की, मसापच्या कार्यकारी मंडळ निवडणुकीतून मी माघार घेत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या सांस्कृतिक युद्धातील मी एक सैनिक आहे. मसापच्या असंवैधानिक कार्यपद्धतीवर आक्षेप  नोंदवणे, हस्तक्षेप करणे हा या निवडणुकीत सहभागी होण्यामागील माझा उद्देश होता आणि आहे.

आवश्य वाचाः मसापच्या निवडणुकीत आरएसएसच्या ‘दांड्या’वर परिवर्तन मंचचा ‘झेंडा’, आंबेडकरवाद्यांचा ‘विद्रोह’ही संघाच्या दावणीला?

यासंदर्भातील प्राथमिक चर्चेत हे अराजकीय स्वरूपाचं,साहित्यिकांचे  पॅनल असल्याचं ठरलं होतं. नंतर बर्‍याच गोष्टी स्पष्ट होत गेल्या. जे सहित नेते ते साहित्य अशी साहित्याची एक व्याख्या केली जाते. पण मसापमध्ये एकानुवर्ती, समता, न्याय, बंधुता याला न मानणारे साहित्यिक व्यवहार होत आले आहेत. माझ्या उमेदवारीमुळे हा असंसदीय व्यवहार जगापुढे  यावा एवढीच माझी अपेक्षा होती व आहे.

हेही वाचाः मसाप निवडणूकः प्रतिभा अहिरे म्हणतात, ‘परिवर्तन मंचमध्ये प्रतिगामी विचारधारेचा लवलेशही नाही, झेंडा-दांड्याची भाषा ध्रुवीकरणासाठीच!’

मी एकच साहेब मानते ते म्हणजे डॉ .बाबासाहेब आंबेडकर…!  संघाविरुद्धची माझी भूमिका जगजाहीर, सुस्पष्ट अन् अपरिवर्तनीय आहे. कुणी प्रमाणपत्र द्यावं म्हणून मी आंबेडकरवादी नाही. आंबेडकरवाद हा माझा व्यवसाय (रोजीरोटी) नव्हे तर ती माझी जीवननिष्ठा आहे. माझ्यासाठी कोणतेही पद, निवडणूक माझ्या  जीवननिष्ठेपेक्षा मोठी नाही. त्यामुळे मी या निवडणुकीतून बाहेर पडत आहे.

मी मसापच्या सुजाण, विवेकी मतदारांना नम्र आवाहन करते की, या ठिकाणी लोकशाही प्रक्रीयेद्वारे बहुजनांना सहित नेणारे साहित्यिक, वाड्मयीन व्यवहार व्हावे यासाठी कोऱ्या मतपत्रिका देऊ नका. या ठिकाणी आपला हस्तक्षेप नोंदवण्याची गरज आहे. या निवडणुकीतून मी माझ्या वैचारिक तत्त्वनिष्ठेला अनुसरून माघार घेत आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल  मनःपूर्वक आभार..
-प्रॉ. डॉ. प्रतिभा अहिरे

न्यूजटाऊनची भूमिका

न्यूजटाऊन कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. बाबासाहेबांचे संविधान ज्या मूल्यांना प्रमाण मानते, तीच मूल्ये न्यूजटाऊन प्रमाण मानते. उपेक्षित, दुर्लक्षित, आधारवंचित समाजाचे विविध प्रश्न, राजकारण आणि धोरण, सरकार आणि प्रशासन या मुद्यांवर लक्ष केंद्रित करून लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण करून भयमुक्त समाजाची जडणघडण हा न्यूजटाऊनचा सर्वोच्च हेतू आहे. Journalism Without Fear & Favor! हे ब्रीद वाक्य घेऊन न्यूजटाऊन वाटचाल करत आले आहे, करत राहील. वैयक्तिक हितसंबंधांपेक्षा संवैधानिक मूल्ये हा न्यूजटाऊनचा कायमच प्राधान्यक्रम राहिला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!