आरबीआयचे पतधोरण जाहीरः रेपो रेट सलग सहाव्यांदा ‘जैसे थे’, स्वस्त कर्जासाठी कर्जदारांना करावी लागणार प्रतीक्षा!


मुंबईः भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आज नवीन तिमाही पतधोरण जाहीर केले. याहीवेळी आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे आरबीआयचा रेपो रेट ६.५ टक्क्यांवर जैसे थे राहणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज ही घोषणा केली. त्यामुळे कर्जदारांना स्वस्त कर्जासठी अजूनही प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

आरबीआयने रेपो रेटबाबत नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. महागाईविरोधात पुकारलेल्या युद्धासाठी आरबीआयने रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा विराम कायम ठेवला आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याची ही सलग सहावी वेळ आहे.

रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षभरापासून रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करता तो स्थिर ठेवल्यामुळे गृह कर्ज आणि कार कर्जासह इतर कर्जच्या ईएमआयमध्ये कपात होण्याच्या कर्जदारांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. रिझर्व्ह बँकेच्या  चलनविषयक समितीच्या यापूर्वी झालेल्या आढावा बैठकीतही रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. याही वेळी तो स्थिर ठेवण्यात आल्यामुळे ग्राहकांना कोणत्याही कर्जाच्या ईएमआयवर सवलत मिळणार नाही किंवा त्यांचा ईएमआय वाढणारही नाही.

रिझर्व्ह बँकेचा सध्याचा रेपो रेट ६.५ टक्के आहे. गेल्या वर्षी ८ फेब्रुवारी २०२३ रोजी रिझर्व्ह बँकेने ०.२५ टक्क्यांनी रेपो रेट वाढवला होता. त्यानंतर चलनविषयक समितीच्या सलग पाच आढावा बैठकांमध्ये रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करता तो समान पातळीवर ठेवण्यात आला. किरकोळ चलनवाढीचा दर ४ टक्के लक्ष्याजवळ आणण्यासाठी व्याजदरात कपात होण्याची शक्यताच नसल्याचा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे.

महागाई हा आरबीआयचा प्राधान्यक्रम

महागाई हा प्राधान्यक्रम असल्याची बाब रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी हे पतधोरण जाहीर करताना अधोरेखित केली. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक आढावा समितीने कोरोना काळात अर्थव्यवस्थेमध्ये पैसा खेळता रहावा यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना कमी करण्यावर भर देण्यावर एकमत दर्शवले. आर्थिक विकासाला हातभार लावतानाच महागाई नियंत्रणात आणण्यासाठी यामुळे मदत होईल, असे दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुढच्या वर्षीचा महागाई दर किती?

 शक्तिकांत दास यांनी पुढील वर्षीच्या महागाई दरावरही भाष्य केले आहे. पुढच्या आर्थिक वर्षात महागाईचा दर ४.५ टक्क्यांवर रहाण्याचा अंदाज आहे. पुढच्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत महागाईचा दर ५ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ४ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.६ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४.७ टक्के राहील, असे दास म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!