चीनमध्ये उद्रेक करणाऱ्या कोरोना व्हेरिएंटच्या चार केस भारतात, गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क अनिवार्य

नवी दिल्लीः  चीनमध्ये ज्या ओमीक्रॉनच्या बीएफ ७ व्हेरिएंटमुळे पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला, त्या व्हेरिएंटचे चार बाधित रूग्ण भारतात आढळून आले आहेत. गुजरात आणि ओडिशात हे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, चीनसह अन्य काही देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे भारत सरकारची आरोग्य यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये आली आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य, लसीकरण पूर्ण करण्यासोबतच अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी देशातील सर्व राज्यांना दिला आहे.

चीनमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. ओमीक्रॉनच्या बीएफ ७ व्हेरिएंटमुळे चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याचे मानले जात आहे. याच व्हेरिएंटमुळे बाधित झालेले रूग्ण अमेरिका, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्कसह अनेक युरोपीयन देशातही आढळून आले आहेत.

मागील काही महिन्यांपासून चीनमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढायला सुरूवात झाली आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या चीन सरकारच्या अधिकृत आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, चीनमधील परिस्थिती अत्यंत भीषण आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागताच चीनने पुन्हा कडक लॉकडाऊनसह अन्य उपाययोजना केल्या आहेत. परंतु लॉकडाऊनमध्ये सूट देताच पुन्हा रूग्णसंख्या वाढू लागली आहे. झिरो कोविड धोरणात सूट देताच बाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. रुग्णालये बाधित रुग्णसंख्येने ओसंडून वाढत आहेत. स्मशानभूमीतील प्रेतांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

पुढील ९० दिवसांत चीनच्या एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के लोकसंख्या कोरोनाबाधित होईल आणि लाखो लोक मृत्युमुखी पडतील, असा अंदाज महामारी विशेषज्ञ एरिक फीगल डिंग यांनी व्यक्त केला आहे. चीनने झिरो कोरोना धोरणात सूट दिली तर १३ लाख २१ लाख लोकांचा जीव जोखीममध्ये येऊ शकते, असे लंडनस्थित ग्लोबल हेल्थ इंटेलिजन्स अँड ऍनालिटिक्स फर्मने म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर भारतातील आरोग्य यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी बुधवारी तज्ज्ञांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेतली. कोरोनाची साथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यायला हवा. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य करण्याबरोबरच बुस्टर डोससह संपूर्ण लसीकरणासाठी प्रयत्न रहा, अशा सूचना त्यांनी सर्व राज्यांना दिल्या आहेत. जास्तीत जास्त कोरोना रुग्णांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्याची सूचनाही त्यांनी राज्यांना केली आहे.

 राज्यात सक्तीबाबत आज निर्णयः केंद्र सरकारच्या सूचनांनंतर राज्य सरकारने पुन्हा कठोर उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूचा राज्यात अद्याप एकही रुग्ण सापडलेला नसला तरी निर्बंध लागू करायचे का?  पुन्हा मास्कची सक्ती करायची की नाही? याबाबतचा निर्णय गुरूवारच्या बैठकीत घेऊ, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!