राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, रमेश बैस नवे राज्यपाल; विरोधक म्हणालेः ही महाराष्ट्राची सुटका!


नवी दिल्लीः महापुरूषांविषयी वारंवार केलेली आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्ये आणि महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात सातत्याने घेतलेली अडवणुकीची भूमिका यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अखेर मंजूर केला आहे. त्यांच्या जागी आता रमेश बैस येणार आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपालांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्या करत असतानाच त्यांनी महाराष्ट्राचे वादग्रस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामाही मंजूर केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असता कोश्यारी यांनी राज्यपालपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा बोलून दाखवली होती. आता महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावरच त्यांचा राजीनामा मंजूर करून त्यांना राजकीय जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काही दिवसांतच सुरू होणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात होत असते. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांकडून केली जात असतानाच या अधिवेशनाआधीच कोश्यारींचा राजीनामा मंजूर करून त्यांना मुक्त करण्यात आले आहे.

 राज्यपाल कोश्यारी यांनी महापुरूषांबद्दल वारंवार केलेल्या आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी राज्यपाल हटाव मोहीम राबवली होती. त्यांच्या विरोधात आक्रमक आंदोलनेही केली होती. प्रधानमंत्री मोदींकडे कोश्यारींनी जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती करूनही त्यांना पदमुक्त न केल्यामुळे विरोधकांनी प्रधानमंत्री मोदी आणि भाजपवर टिकास्त्रही सोडले होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात अडवणुकीची भूमिका घेऊन या सरकारला चांगलेच जेरीस आणले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याबाबत त्यांनी कायमच विरोधी भूमिका घेतली होती. राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा वाद चांगलाच रंगला होता.

महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याची एकही संधी कोश्यारींनी सोडली नव्हती. हा वाद इतका टोकाला पोहोचला होता की, कोश्यारींनी घेतलेल्या भूमिकेचे उट्टे काढण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी न दिल्यामुळे तब्बल पाऊणतास थांबून कोश्यारींना सरकारी विमानातून उतरवण्यात आले होते.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झाल्यापासून मात्र राज्यपाल कोश्यारी शांत होते. कोश्यारी यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कारकीर्द वादग्रस्त ठरली. महाराष्ट्राच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले. कोश्यारींच्या राजीनाम्यामुळे विरोधकांनी आनंद व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राची सुटका-शरद पवारः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली. अतिशय चांगला निर्णय. हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती कधीही राज्यपाल म्हणून झाली नव्हती, ते आपण पाहिले आहे. केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी त्यात बदल केला, ही समाधानकारक बाब आहे, असे पवार यांनी म्हटले आहे. राज्यपालांनी जे संविधान विरोधी निर्णय घेतले होते, त्याचे काय होणार? असे विचारले असता जर संविधानाच्या विरोधात काही झाले असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, असेही पवार म्हणाले.

उशीरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला- सुप्रिया सुळेः राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोश्यारींच्या राजीनाम्यावर आनंद व्यक्त केला आहे. देर आए दुरूस्त आए. उशिरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला, असे सुळे यांनी म्हटले आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मी शुभेच्छा देते. त्यांनी पारदर्शक आणि संविधानाच्या चौकटीत राहून काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

हा महाराष्ट्राचा विजय-आदित्य ठाकरेः शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोश्यारींच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राचा मोठा विजय! महाराष्ट्रविरोधी राज्यपालांचा राजीनामा अखेर स्वीकारला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आपली राज्यघटना, विधानसभा आणि लोकशारीतील आदर्श यांचा सातत्याने अपमान करणाऱ्या व्यक्तीला राज्यपाल म्हणून स्वीकारता येणार नाही, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.  

नवे राज्यपाल बैस की बायस?-राऊतः शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही कोश्यारींच्या राजीनाम्यावरून भाजपला लक्ष्य केले आहे.  महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या विरोधात राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जनता रस्त्यावर उतरली. भाजपचे एजंट म्हणून राजभवनातून राज्यपालांनी काम केले. राज्यपालांचा राजीनामा मंजूर करून महाराष्ट्रावर उपकार केलेले नाहीत. त्यांची हकालपट्टी पूर्वीच करायला हवी होती. केंद्र सरकारने जर राज्यातील सामान्य जनतेचा आवाज ऐकला असता तर फार पूर्वीच राज्यपालांना घरचा रस्ता दाखवला गेला असता, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

 महाराष्ट्राला आता नवे राज्यपाल मिळाले आहेत. रमेश बैस यांच्या नावात बैस आहे की बायस हे मला माहीत नाही. महाराष्ट्रात त्यांचे स्वागतच होईल, असेही राऊत म्हणाले. 

कोण आहेत रमेश बैस?

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले रमेश बैस मूळचे छत्तीसगढचे आहेत. ते सात वेळा खासदार राहिले आहेत. आजपर्यंतच्या एकाही निवडणुकीत ते पराभूत झालेले नाहीत. सध्या ते झारखंडचे राज्यपाल आहेत. त्याआधी त्यांनी त्रिपुराचे राज्यपालपदही सांभाळले आहे. २ ऑगस्ट १९४७ रोजी जन्मलेले रमेश बैस १९७८ मध्ये पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी वाजपेयी सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून काम केले आहे.

मध्य प्रदेश विभाजन होऊन छत्तीसगढची निर्मिती होण्याआधी त्यांनी मध्यप्रदेशचे आमदार म्हणूनही काम केले आहे. १९८० ते १९८४ दरम्यान ते मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. लालकृष्ण आडवाणी यांचे ते निकटवर्तीय समजले जातात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपने त्यांचे तिकिट कापले होते. आडवाणींचे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्यात आले, असे त्यांचे समर्थक सांगतात.    


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!