हिंगोली मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बाबुराव कोहळीकरांच्या विरोधात मतदारांचा रोष, प्रचारासाठी आलेल्या नेत्यांना पिटाळले!


उमरखेडः लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचत चालली असतानाच ठिकठिकाणचे मतदार सत्ताधारी पक्षाबद्दल आपला रोष व्यक्त करत आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजप नेते अशोक चव्हाण यांना मतदारांच्या रोषाला सामोरे लागण्याची घटना ताजी असतानाच हिंगोली लोकसभा मतदारसंघातही सत्ताधारी महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या विरोधातही मतदारांचा रोष पहायला मिळू लागला आहे. उमरखेड तालुक्यातील मतदारांनी आष्टीकरांच्या प्रचारासाठी आलेल्या नेत्यांना पिटाळून लावले. मतदारांचा हा रोष कोहळीकरांसमोरील अडचणी वाढवणारा ठरण्याची शक्यता आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाकडून आधी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपने केलेला विरोध आणि उमेदवारी बदलण्यासाठी टाकलेल्या दबावामुळे अखेर शिवसेनेच्या शिंदे गटाने त्यांचा पत्ता कापला आणि बाबुराव कदम कोहळीकरांना उमेदवारी जाहीर केली.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोहळीकर प्रचाराला लागले. नेते, कार्यकर्ते गावोगावी फिरून प्रचार करू लागले. आता त्यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघाचा भाग हिंगोली लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघातील मरसुळ गावात सत्ताधारी शिंदे गटाच्या नेत्यांना मतदरांच्या विरोधाला सामोरे जावे लागले.

उमरखेड-महागाव विधानसभेचे आमदार नामदेव ससाणे हे चितांगराव कदम आणि कार्यकर्त्यांसह सत्ताधारी महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी मरसुळ गावात गेले होते. तेथे गावकऱ्यांनी त्यांना प्रचंड विरोध केला. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आंदोलन करणाऱ्या तरूणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याचा जाब मतदारांनी या नेत्यांना विचारला मतदारांचा हा रोष आणि विरोध पाहून आमदार ससाणे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी मरसुळ गावातून काढता पाय घेतला.

मरसुळ गावात मतदारांकडून झालेला विरोध आणि व्यक्त झालेला रोष हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या अडचणीत भर घालणारा ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच नांदेड लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी महायुतीचे नेते अशोक चव्हाण यांना असेच मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. ही घटना ताजी असतानाच मरसुळ गावात ही घटना घडल्यामुळे महायुतीचे उमेदवार चिंतेत पडले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!