ओबीसी नेते छगन भुजबळ लवकरच अजित पवारांची साथ सोडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेणार?


मुंबईः  अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महायुती सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे पुन्हा एकदा पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. ७६ वर्षीय भुजबळ हे अनेक पर्यायांवर विचार करत असून त्यापैकी पहिली पर्याय स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा असून दुसरा पर्याय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत सामील होऊन हाती मशाल घेण्याचा आहे. परंतु भुजबळ हे दुसरा पर्यायच स्वीकारण्याची जास्त शक्यता व्यक्त केली जात आहे.

ओबीसी समाजासाठी आक्रमक भूमिका घेणारे छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यांना नाशिक मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. परंतु महायुतीने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यानंतर प्रफुल्ल पटेलांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठीही ते उत्सुक होते. परंतु लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिली. त्यामुळे आधीच नाराज असलेल्या भुजबळांची नाराजी आणखी वाढली आहे.

नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी नाकारल्यामुळे भुजबळ नाराज होतेच. मात्र आपल्याला राज्यसभेवर पाठवले जाईल, अशी त्यांची अपेक्षा होती. ती त्यांनी बोलूनही दाखवली होती. परंतु भुजबळांची तीही अपेक्षा पूर्ण झाली नाही. त्यामुळे भुजबळांची नाराजी आणखीच वाढली, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या समता परिषदेच्या बैठकीत भुजबळांवर कार्यकर्त्यांनी वेगळा निर्णय घेण्यासाठी दबाव आणला असल्याचे सांगितले जाते. भुजबळांकडे अनेक पर्याय आहेत. त्याचा सारासार विचार करून ते योग्य निर्णय घेतील. समता परिषदेच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. पण अजित पवार गटातून छगन भुजबळ बाहेर पडणार हे निश्चित आहे, असे छगन भुजबळ यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळांना त्यांचे भवितव्य अंधारात दिसत आहे. महायुतीने त्यांना उमेदवारी देऊ, असे म्हटले होते; परंतु त्यांचे नावच जाहीर केले नाही. शेवटी भुजबळांनीच माघार घेतली. त्यांनी लोकसभा उमेदवारीवरून अजित पवार किंवा महायुतीला वेठीस धरले नाही. परंतु छगन भुजबळांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना छुपा पाठिंबा दिला, हे आता जवळपास सर्वांनाच माहीत आहे. छगन भुजबळ एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मिळालेल्या मताधिक्याबाबत त्यांचे उघडपणे तोंडभर कौतुकही केले आहे, असे अन्य एका नेत्याने हिंदुस्थान टाइम्सला सांगितले.

भुजबळांसमोरील पर्याय कोणते?

छगन भुजबळ हे अजित पवार यांच्या पक्षातून बाहेर पडणार हे जवळपास निश्चित मानले जात असले तरी त्यांच्या पुढे चार पर्याय आहेत. पहिला पर्याय- स्वतःचा पक्ष स्थापन करणे, दुसरा पर्याय-शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत जाणे, तिसरा पर्याय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सामील होणे आणि चौथा पर्याय काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचाही आहे.

१. भुजबळ हे शरद पवारांकडे परत जाण्याची शक्यता कमीच आहे. अजित पवारांनी बंड केल्यानंतर भुजबळांनी शरद पवारांविरुद्ध आक्रमक भूमिका मांडली होती. त्यामुळे शरद पवारांचा पर्याय शक्यतेपलीकडचा मानला जातो. सुमारे तीन दशकांपूर्वी छगन भुजबळांनी शिवसेनेत पहिले बंड केले होते. तेव्हा ते शिवसेनेचे ११ आमदार घेऊन बाहेर पडले होते. बंडानंतर भुजबळ काँग्रेसमध्ये गेले. शरद पवारांनी काँग्रेस सोडल्यानंतर तेही बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेत त्यांचा संस्थापक सदस्य म्हणून सहभाग आहे.

२. अजित पवारांची साथ सोडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा पर्यायही छगन भुजबळांपुढे आहे. शिवसेनेशी कट्टर वैर असणारा नेता अशी प्रतिमा असलेल्या भुजबळ २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचे सरकारमध्ये मंत्री होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंशी चांगलेच जुळवून घेतले. त्यामुळे भुजबळांनी शिवसेनेत परत येण्याची इच्छा दर्शवली तर उद्धव ठाकरे त्यांचे स्वागत करतील, परंतु शिवसेनेच्या जुन्या नेत्यांना ते कितपत आवडेल? हाही प्रश्न आहे.

३. शिवसेनेच्या जुन्या नेत्यांकडून भुजबळांच्या प्रवेशाला विरोध झालाच तर भुजबळांसमोर शेवटचा पर्याय काँग्रेस प्रवेशाचा आहे. तेथे मात्र त्यांना विरोध होण्याची शक्यता नाही. या सर्व पर्यायांपैकी भुजबळ कोणता पर्याय निवडतात, हे नजीकच्या काही दिवसांतच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

जरांगे- भुजबळ संघर्ष

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर छगन भुजबळांनीही ओबीसींसाठी आक्रमक आणि ठाम पवित्रा घेतला. महाराष्ट्रभर त्यांनी ओबीसी समाजाचे मेळावे घेतले. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिला. आरक्षणाच्या मुद्यावरून भुजबळांनी घेतलेली भूमिका महायुतीच्या भूमिकेशी सुसंगत नव्हती. या मुद्यावरून मंत्रिमंडळ सहकाऱ्यांशी त्यांचे मतभेदही झाले. छगन भुजबळांची मराठा समाजात असलेली प्रतिमा पाहूनच त्यांना लोकसभेची उमेदवारी आणि नंतर राज्यसभेवरची संधी नाकारल्याचे बोलले जाते.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!