विधान परिषद निवडणुकीत अजित पवारांची कसोटी, क्रॉस वोटिंग करून राष्ट्रवादीच्या आमदारांकडूनच गेम केला जाण्याची भीती


मुंबई: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाळ २७ जुलै २०२४ रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या जागांकरिता द्वैवार्षिक निवडणूक होत असून यासाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत अजित पवारांची कसोटी लागणार असून गुप्त मतदानामुळे अजितदादांचे आमदार क्रॉस वोटिंग करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विधान परिषद सदस्य डॉ.मनीषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुल्ला खान अ.लतीफ खान दुर्राणी, निलय नाईक, ॲड. अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ.वजाहत मिर्झा अथर मिर्झा, डॉ.प्रज्ञा सातव, महादेव जानकर आणि जयंत प्रभाकर पाटील हे २७ जुलै रोजी विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी ही निवडणूक होत असून लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर महायुती काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. भाजप आणि शिंदे शिवसेनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल कमालीची नाराजी आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांचे कामच केले नसल्याचा भाजप आणि शिंदे शिवसेनेतील नेत्यांचा दावा आहे.

त्यातच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार गटाचे अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार घरवापसी करणार असल्याचा दावा आ. रोहित पवार यांनी केला आहे. त्यापार्श्वभूमीवर गुप्त मतदान असलेल्या विधान परिषद निवडणुकीत अजित पवार गटाचे आमदार क्रॉस वोटिंग करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसे झालेच तर अजित पवारांवर मोठी नामुष्की ओढवू शकते.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

या निवडणुकीसाठी २५  जून रोजी अधिसूचना जारी केली जाईल. २ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी ३ जुलै  रोजी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ५ जुलै आहे.

१२ जुलै  रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होईल. मतदानानंतर दिवशी ५ वाजेनंतर मतमोजणी करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया १६ जुलैपर्यंत पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!