आश्चर्यच! पतीने नव्हे, पत्नीनेच दिला फोनवर तीन तलाक!


भोपाळः देशात तीन तलाक कायदा लागू होण्याच्या आधी मुस्लिम समाजात पतीने पत्नीला ‘तलाक, तलाक, तलाक’ म्हणत घटस्फोट दिल्याचे अनेक किस्से सांगितले जात होते. परंतु मध्य प्रदेशातील एका महिलेनेच तिच्या पतीला फोनवर तलाक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकरण थोडे जुने आहे, परंतु त्या महिलेचा पती आणि पित्याने नुकतीच पोलिसांचा दरवाजा खटखटकवल्यामुळे फाइल रि-ओपन झाली आहे. तर मी माझ्या नवीन पतीसोबत खूपच खुश आहे, असे त्या महिलेने स्पष्ट केले आहे.

मध्य प्रदेशातील रिवा शहरातील दोन मुलांची आई असलेल्या महिलेने तिच्या पतीला फोनवरच तलाक दिल्याच्या आणि तलाक दिल्यानंतर दुसरा निकाह केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर नव्या वादाला सुरूवात झाली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुस्लिम धर्मगुरूंमध्येच वाद सुरू झाला आहे. अलाहाबादच्या मुस्लिम धर्मगुरूने मध्य प्रदेशातील हे प्रकरण पूर्णतः चुकीचे असल्याचे सांगत फतवा जारी केला आहे.

महिलेचा पती अजीज खान आणि पिता शेख इस्लामुद्दीन गेल्या चार महिन्यांपासून पोलिस आणि मुस्लिम धर्मगुरूंचे उंबरठे झिजवत आहेत. शहरातील काझीच्या विरोधात कारवाईची मागणी घेऊन ते 29 जुलै रोजी पोलिस अधीक्षकांना भेटले. शहरातील काझी मुफ्ती मुबारक हुसैन यांनी दिशाभूल करून, जन्नतची स्वप्ने दाखवून आणि पैसे घेऊन कोणाच्याही परवानगीशिवाय तीन तलाक करून दुसरा निकाह लावून दिल्याचा तक्रारकर्त्यांचा आरोप आहे.

दुसरीकडे, लिखित तलाकची आवश्यकता नाही, मौखिक तलाकही मान्य होतो, असे काझी हुसैन यांचे म्हणणे आहे. जर आपल्याकडे कोणी आले तर त्याला आपण शरियतला अनुसरूनच सल्ला देतो, असेही काझीचे म्हणणे आहे. पोलिस अधीक्षकांची भेट घेण्यापूर्वी महिलेचा पहिला पती आणि पित्याने अलाहाबादचे मुफ्ती शफीक अहम शरीफी यांच्याकडे विचारणा केली होती की, विवाहित आणि दोन मुलांची आई असलेली महिला पती किंवा पित्याशी सल्लामसलत केल्याशिवाय मौखिक तलाक देऊ शकते काय?  त्यावर त्यांनी असे केले जाऊ शकत नाही. शरीयत असे करण्याची अनुमती देत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

नंतर अलाहाबादचे मुफ्ती शफीक अहम शरीफी यांनी एक फतवा जारी केला. ज्या काझीने महिलेचा दुसरा निकाह (विवाह) लावला आहे, तो चुकीचा आहे. शरीयतमध्ये (इस्लामी कायदे-कानून) त्याला कोणतेही स्थान नाही, असे या फतव्यात शरीफी यांनी म्हटले आहे.

विवाहित महिला जिला दोन मुले आहेत, तिचा दुसऱ्या व्यक्तीसोबत निकाह लावणे इस्लाममध्ये हराम आहे, असे या फतव्यात लिहिले आहे. अखेर कोणत्या आधारावर दुसरा निकाह लावण्यात आला आहे? असा सवालही या फतव्यात रीवाच्या शहर काझींना करण्यात आला आहे.

महिलेचा पती अजीज यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचा विवाह २०११ मध्ये झाला होते. दोघांना दोन मुले आहेत. विवाहानंतर अनेक वर्षे सर्वकाही व्यवस्थित सुरू होते. दरम्यानच्या काळात पत्नी काझीच्या बहकाव्यात आली. ती अचानक बेपत्ता झाली. नंतर एका दिवशी तिचा फोन आला. तिने मला फोनवर तीन वेळा तलाक म्हटले. ते ऐकून मी घाबरून गेलो. जेव्हा शोधाशोध केली तर लक्षात आले की, शहर काझीने तिचा निकाह दुसऱ्याच व्यक्तीशी लावून दिला आहे.

जन्नत’ची स्वप्ने दाखवली

महिलेचा पिता शेख इस्लामुद्दिनच्या मते, त्यांनी १४ वर्षांपूर्वी आपल्या मुलीचा विवाह खौर येथे केला होता. मुलगी आणि जावई दोघेही एकदम चांगले रहात होते. दोघांची दोन मुले आहेत. ६ महिन्यांपूर्वी ती शहर काझीच्या संपर्कात आली. इस्लाम आणि इबादतच्या संबंधी जाणून घेण्यासाठी ती काझीला भेटू लागली. काझीने तिला सांगितले की, शरीयतनुसार तीन तलाक ‘जायज’(योग्य) आहे. जर तू तुझ्या पतीला सोडून देऊन मी सांगितल्याप्रमाणे निकाह केलास तर तुला जन्नत मिळेल. अशी दिशाभूल करून शहर काझीने तिचा दुसरा निकाह लावून दिला.

मौखिक तलाक अमान्य

मौखिक तलाक नियमबाह्य आहे. नव्या अधिनियमानुसार तलाख लिखित प्रक्रियेनुसारच झाला पाहिजे. शहर काझीचा पूर्ण जबाब वाचावा लागेल, असे रीवाचे पोलिस अधीक्षक विवेक सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!