उद्धव ठाकरेंविरुद्ध कारवाईचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश, लोकसभा निवडणूक निकालाआधीच मोठा झटका


नवी दिल्लीः  राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदान सुरू असताना पत्रकार परिषद घेतल्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे निवडणूक निकालाधीच ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. मुंबईत मतदान सुरू असताना तेथे शिवसेनेची मते आहेत, तेथे मतदान प्रक्रिया संथ गतीने पार पाडली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत केला होता.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदासंघात मतदान घेण्यात आले. ही मतदान प्रक्रिया सुरू असताना काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तर काही ठिकाणी मतदान संथ गतीने सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

मुंबईतील मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी आहे. मात्र ज्या ठिकाणी शिवसेनेची मते आहेत, त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींकडून दिरंगाई केली जात आहे. त्याचा मतदारांना नाहक त्रास होत आहे. पराभवाच्या भीतीने जाणीवपूर्वक हा प्रकार सुरू आहे. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत आहे. हे सगळे भाजपच्या इशाऱ्यावर सुरू आहे, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी मतदान प्रक्रिया सुरू असताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता.

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेवर आक्षेप घेऊन भाजप नेते आशिष शेलार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. शेलार यांच्या तक्रारीची दखल घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. आता राज्य निवडणूक आयोग उद्धव ठाकरेंकडून आदर्श आचारसंहितेचा भंग झाला का, याची पडताळणी करेल आणि त्यांच्याकडून तसा भंग झाल्याचे स्पष्ट झाल्यास उद्धव ठाकरेंविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

आयोगाच्या निर्देशांवरही टिकास्त्र

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध कारवाईचे निर्देश दिल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगावर टिकास्त्र सोडण्यात आले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी यावरून भाजप व निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे.

सुषमा अंधारेः ‘आशिष शेलार यांची निवडणूक आयोगात जास्त ओळख असल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यांनी एक शिफारस आमच्यासाठीही करावी. बीडमध्ये दमदाटी आणि पैसे वाटपाचे व्हिडीओ आम्ही शेअर केले, मात्र निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली नाही. आशिष शेलारांनी आमच्यासाठई आयोगाला शिफारस करावी आणि बीडमधील प्रकारावरही कारवाई करण्यास सांगावे’, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

संजय राऊतः ‘शिवसेना नेते संजय राऊत यांनीही निवडणूक आयोगाच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आतापर्यंत निवडणूक आयोगाला अनेक पत्रे लिहिली, त्यावर निवडणूक आयोगाने काहीही कारवाई केली नाही. जी कारवाई करायची, ती करू द्या, आम्ही त्याचे स्वागत करतो’, असे संजय राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *