मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या चुकांवर बोट ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी भरसभेत त्यांची चांगलीच खिल्ली उडवली. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतील मेट्रोच्या विस्ताराची माहिती देताना आम्ही साडेतीनशे पन्नास किलोमीटर मेट्रोलाइम टाकली, असे वक्तव्य केले होते. त्याचाही अजित पवारांनी समाचार घेतला. साडेतीनशे पन्नास किमी कशाला म्हणतात? गणिताचे विद्यार्थी तर तोंडात बोटच घालतील, असे अजित पवार म्हणाले.
महाविकास आघाडीची तिसरी विराठ वज्रमूठ सभा मंगळवारी महाराष्ट्रदिनी बीकेसीच्या मैदानात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या सभेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. यासभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही जोरदार टोलेबाजी केली. माझ्याविषयी सध्या कंड्या पिकवल्या जात आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. त्यावर विश्वास ठेवू नका, असे पवार म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चुकांचा उल्लेख करत त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. काल की परवाच काही उद्योगपतींसमोर भाषण सुरू होते. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही मुंबईत साडेतीनशे पन्नास किमी मेट्रोलाईन टाकली. आता कशाला साडेतीनशे पन्नास म्हणतात कुणाला माहिती. ते राज्याच्या १३-१४ कोटी जनतेचे प्रमुख आहेत. जर त्यांना जमत नसेल तर त्यांनी नोट काढावी आणि वाचावी. काही बिघडत नाही. मात्र साडेतीनशे पन्नास कोटी कशाला म्हणतात? गणिताचे विद्यार्थी तर तोंडात बोटच घालतील, असा टोला पवारांनी मारला.
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला नपुंसक म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने देशातील इतर कोणत्या राज्य सरकारला नपुंसक म्हटले नाही. याचीही यांना जनाची नाही, मनाची लाज वाटत नाही. राज्यात प्रक्षोभक भाषणे होत असताना, दंगली माजवण्याचा प्रयत्न होत असताना ते थांबवण्याची ताकद ज्या राज्य सरकारमध्ये नाही ते नपुंसक सरकार आहे, अशी खरडपट्टी सर्वोच्च न्यायालयाने काढली. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? हा महाराष्ट्राचा कमीपणा नाही का?, असा सवाल अजित पवार यांनी केला.
आपण शेवटी सर्वजण महाराष्ट्रीयन आहोत. आपलीही अशा गोष्टींमुळे शरमेने मान खाली जाते. परंतु नैतिकदृष्ट्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना याबद्दल काहीही वाटत नाही. मुख्यमंत्री अलीकडे अनेकदा चुकलेले मी पाहिले आहे. तुम्ही पाहिले असेल. मागे म्हणाले की, देशाच्या प्रधानमंत्री द्रौपदी मुर्मू. आता द्रौपदी मूर्मू देशाच्या प्रधानमंत्री आहेत की राष्ट्रपती हेही माहिती नाही आणि मुख्यमंत्री बोलत आहेत, असे टिकास्त्र अजित पवारांनी सोडले.
मुख्यमंत्र्यांनी मागे एमपीएससी आणि निवडणूक आयोगातही घोटाळा करून टाकला होता. त घोटाळा करूनच मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे घोटाळा आणि मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे काही सुटायला तयार नाही. आता त्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे, असे अजित पवार म्हणाले.
सरकार निवडणुका घ्यायला का घाबरतेय? तुम्ही भीती कशाची वाटतेय? तुम्ही निवडणूक जाहीर का करत नाही? आता तर पावसाळा पण नाही. परंतु यांच्या मनामध्ये केवळ भीती आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर जनता काय करेल याबद्दलचा विश्वास शिंदे फडणवीस सरकारला नाही. हे लोकांच्या मनातले सरकार नाही. हे दगाफटका आणि गद्दारी करून आलेले सरकार आहे, असेही अजित पवार म्हणाले.