निवडणुका लावा, जमीन काय असते ते अमित शाहांना दाखवूः उद्धव ठाकरेंचे खुले आव्हान

मुंबईः  महाविकास आघाडीची वज्रमूठ भक्कम असून मुंबई महापालिकाच काय, अगदी  जिल्हा परिषदेच्या निवडणुका लावा, लोकसभा- विधानसभेच्या निवडणुका लावा किंवा तीन निवडणुका एकत्र लावा, महाविकास आघाडीच्या वज्रमुठीचा एकच ठोसा लावू. तुमचा पराभव करून जमीन काय असते ते अमित शाहांना दाखवू, असे खुले आव्हान शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

महाविकास आघाडीची तिसरी विराठ वज्रमूठ सभा मंगळवारी महाराष्ट्रदिनी बीकेसीच्या मैदानात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या सभेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते.

 वज्रमुठीचा हिसका तुम्ही पाहिला असेल. कसब्या निवडणूक, मार्केट कमिटीची निवडणूक असेल, विधान परिषदेची निवडणूक असेल किंवा अंधेरीची निवडणूक असेल. महाविकास आघाडीच्या वज्रमुठीच्या ताकदीने विजय मिळाला आहे, असे ठाकरे म्हणाले.

 कधीही पुरी न होणारी आश्वासने देऊन लोकांना फसवून निवडणुका जिंकायच्या आणि मग लोकांमध्ये जातीय, धार्मिक तेढ निर्माण करून, धार्मिक भावना भडकावून, दंगली घडवून लोकांना आश्वासनांचा विसर पाडायचा ही भाजपची नेहमीची निती राहिली आहे. आता त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा निर्धारही ठाकरे यांनी बोलून दाखवला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचाही ठाकरे यांनी समाचार घेतला. ९१ वेळा दिलेल्या शिव्या मोजणारी ही किती सभ्य माणसे आहे. मला मोदींना सांगायचे आहे की, मी शिव्या देण्याचे समर्थन करत नाही. शिव्या देता येतात. पण तुम्हाला जेव्हा वाटते की काँग्रेस तुम्हाला शिव्या देतेय, तेव्हा तुमची भोकं पडलेली टिनपाट लोक मला, आदित्यला आणि माझ्या कुटुंबीयांना दररोज बोलतात, तेव्हा तुमचे तोंड गप्प का आहे?  ते माझ्यावर ज्या भाषेत बोलतात, त्या भाषेत माझा शिवसैनिक अजून बोललेला नाही. आम्ही तुमचा मान ठेवतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण तुम्ही त्या टिनपटांना जी भोकं पडली आहेत, त्यांना बुच घाला म्हणजे सगळे चांगले होईल, असे ठाकरे म्हणाले.

हीच शिकवण तुम्ही तुमच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये दिली आहे का? म्हाळगी प्रबोधिनीबद्दल मला आदर आहे. प्रमोद महाजन, विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासारखी माणसे या संस्थेचे काम बघायचे. तिकडे चिंतनं व्हायची. अजून काही काही व्हायचे. मग तुम्हाला रामभाऊ म्हाळगींनी ही भाषा शिकवली का? मग ते सगळे संस्कार कुठे गेले?  ती संस्कारी माणसे कुठे गेली? म्हणून मी पुन्हा पुन्हा विचारतोय, अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विचारतोय, हे असे अपत्य तुम्हाला मान्य आहे का?, असे ठाकरे म्हणाले.

६ मे रोजी बारसूला जाणार, सभाही घेणार

 बारसूबद्दल माझे पत्र नाचावले जातेय. होय, मी बारसूला रिफायनरी व्हावी, यासाठी पत्र लिहिले होते. पण लोकांच्या विरोधानंतर त्यांना लाठ्याकाठ्यांनी मारा-झोडा असे सांगितले होते का?  येत्या ६ तारखेला मी बारसूला जाणार आहे. तिकडे अनेकांना जाऊ दिले जात नाही. बारसू म्हणजे काही पाकव्याप्त काश्मीर नाही. हिम्मत असेल तर अडवून दाखवा, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले. ६ मेला बारसूला जाऊन तेथील लोकांशी बोलणार आहे. सभाही घेणार आहे, असे ठाकरे म्हणाले.

 साडेतीनशे पन्नास किमी कशाला म्हणतात?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या सभेत जोरदार टोलेबाजी केली. माझ्याविषयी सध्या कंड्या पिकवल्या जात आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. त्यावर विश्वास ठेवू नका, असे पवार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चुकांचा उल्लेख करत त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. काल की परवाच काही उद्योगपतींसमोर भाषण सुरू होते. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही मुंबईत साडेतीनशे पन्नास किमी मेट्रोलाईन टाकली. आता कशाला साडेतीनशे पन्नास म्हणतात कुणाला माहिती. ते राज्याच्या १३-१४ कोटी जनतेचे प्रमुख आहेत. जर त्यांना जमत नसेल तर त्यांनी नोट काढावी आणि वाचावी. काही बिघडत नाही. मात्र साडेतीनशे पन्नास किमी कशाला म्हणतात? गणिताचे विद्यार्थी तर तोंडात बोटच घालतील, असा टोला पवारांनी मारला.

मुख्यमंत्र्यांनी मागे एमपीएससी आणि निवडणूक आयोगातही घोटाळा करून टाकला होता. त घोटाळा करूनच मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे घोटाळा आणि मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे काही सुटायला तयार नाही. आता त्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे, असे अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!