नांदेडः नांदेड शहरालगतच असलेल्या बोंढार हवेली गावातील बौद्ध तरूण अक्षय भालेराव याची गावातील सवर्ण गावगुंडांनी निर्घृण हत्या केल्यामुळे समाजमन ढवळून निघाले आहे. अक्षय भालेरावच्या खून्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी लावून धरण्यात आली आहे. त्याचबरोबर या हत्येच्या निषेधार्थ सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. परंतु सोशल मीडियावर येणाऱ्या या प्रतिक्रियांमुळे नांदेड पोलिसांनी नांदेडच्या दलित कार्यकर्त्यांना सीआरपीसीच्या कलम १४९ नुसार नोटिसा बजावल्या असून वादग्रस्त पोस्ट किंवा सार्वत्रिक विधान केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
अक्षय भालेराव या तरूणाने पुढाकार घेऊन बोंढार हवेली गावात भीम जयंतीची मिरवणूक काढली होती. गावात प्रथमच वाजतगाजत भीम जयंती मिरवणूक निघालेली पाहून पित्त खवळलेल्या सवर्ण गावगुंडांनी किराणा दुकानावर उभा असलेल्या अक्षय भालेरावची एकटा घेरून १ जून रोजी निर्घृण हत्या केली.
अक्षय भालेरावच्या हत्येमुळे महाराष्ट्रातील बौद्ध समाजातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. त्याचे प्रतिबिंब सोशल मीडियावरही उमटत आहे. परंतु सोशल मीडियावर उमटणाऱ्या या प्रतिक्रियांमुळे नांदेड शहरात कायदा व सुव्यवस्था स्थितीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती पोलिसांना वाटत आहे. त्यामुळे बोंढार हवेली हत्याकांडासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या दलित कार्यकर्त्यांना नांदेड पोलिसांनी सीआरपीसीच्या कलम १४९ नुसार नोटिसा बजावत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
अशीच एक नोटीस नांदेडमधील वंचित बहुजन आघाडीचे नेते श्याम निलंगेकर यांनाही बजावण्यात आली आहे. अशाच नोटिसा नांदेड शहरातील अन्य दलित कार्यकर्त्यांनाही बजावण्यात आल्याचे सांगण्यात येते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येत्या १० जूनला नांदेड दौऱ्यावर येत आहेत. शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रावण साम्राज्य सेनेने केंद्रीय गृहमंत्र्यांना नांदेड जिल्हा बंदी करणार व त्यांना नांदेड जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यासंदर्भातील पोस्ट श्याम निलंगेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यामुळे त्यांना नांदेड पोलिसांनी सीआरपीसीच्य कलम १४९ नुसार नोटीस बजावली आहे.
‘आपण नजीकच्या काळातील अमित शहा केंद्री गृहमंत्री, भारत सरकार यांच्या नांदेड जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने रावण साम्राज्य सेनेच्या वतीने केंद्रीय गृहमंत्र्यांना नांदेड जिल्हाबंदी करणार व त्यांना नांदेड जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्याची पोस्ट/मजकूर फेसबुक या सोशल मीडियावर टाकली आहे. आपण केलेल्या पोस्टवरून नांदेड शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे,’ असे पोलिसांनी या नोटिशीत म्हटले आहे.
‘आपण वरीलप्रमाणे कोणतीही वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये किंवा सार्वत्रिक विधान करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. जर आपण यानंतर असे वादग्रस्त पोस्ट किंवा सार्वत्रिक विधान केले तर आपणाविरुद्ध अधिक कायदेशीर कारवाई येईल आणि सदरचे पत्र हे पुरावा म्हणून वापरण्यात येईल,’ अशी तंबी या नोटिशीत देण्यात आली आहे.