नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस जिंकली, फेरमतमोजणीत ८०० मतांची लीड थेट १,४५७ वर;  भाजप नेते अशोक चव्हाणांना धक्का


नांदेडः विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव झालेला असताना नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मात्र काँग्रेसने निसटता विजय मिळवला. काँग्रेस उमेदवार रविंद्र चव्हाण हे १ हजार ४५७ मतांनी विजयी झाले. शेवटच्या क्षणापर्यंत विजयाची खात्री असलेले भाजप उमेदवार संतुक हंबर्डे यांना पराभवाची धूळ चाखावी लागली.

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे चार महिन्यांपूर्वी अकाली निधन झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीबरोबरच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. रविंद्र चव्हाण आणि महायुतीचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांच्यात सरळ लढत झाली. लोकसभा पोटनिवडणुकीत १२ लाख ९४ हजार १५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीपासूनच भाजपचे उमेदवार संतुकराव हंबर्डे हे आघाडीवर होते. त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. संतुकराव हंबर्डे हे ११ हजाराहून अधिक मतांनी लीडवर होते. परंतु सायंकाळी पोस्टल मतांची मतमोजणी झाली आणि काँग्रेसचे उमेदवार रविंद्र चव्हाण हे आघाडीवर आले. रविंद्र चव्हाण यांचा ८०० मतांनी विजय झाला होता. त्यावर भाजपने आक्षेप घेतला.

भाजपच्या आक्षेपानंतर पुन्हा मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीत रविंद्र चव्हाण यांची ८०० लीड वाढून ती १ हजार ४५७ मतांवर पोहचली. म्हणजेच फेरमतमोजणीत चव्हाणांची लीड जवळपास दुपटीने वाढली आणि त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

काँग्रेसचे रविंद्र चव्हाण यांना ५ लाख ८६ हजार ७८८ मते मिळाली तर भाजपचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांना ५ लाख ८५ हजार ३३१ मते मिळाली. विशेष म्हणजे या पोटनिवडणुकीत सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा ७ टक्के अधिक मतदान झाले होते. वाढलेल्या मतांच्या टक्केवारीचा फायदा भाजप उमेदवाराला होईल, असा अंदाज बांधला जात होता. परंतु तो सपशेल फेल ठरला.

भाजप उमेदवार संतुकराव हंबर्डे यांच्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, पंकजा मुंडे यांच्या सभा झाल्या होत्या. परंतु नांदेडच्या मतदारांनी रविंद्र चव्हाण यांच्या गळ्यात विजयाची माळ टाकत भाजप नेते अशोक चव्हाणांना धक्का दिला.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!