मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत ‘युतीचा धर्म’ जिंकणार की सर्वात मोठा पक्ष?, काय आहेत शक्यता?


मुंबईः महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? भाजप नेते देवेंद्र फडणवीस की शिवसेना नेते एकनाथ शिंदे?  असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. त्याचे कारण असे की २८८ सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत तब्बल १३२ जागा जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. बहुमतासाठी १४५ जागांची गरज आहे. म्हणजेच भाजपकडे बहुमतासाठी केवळ १३ जागा कमी आहेत. एकनाथ शिंदे सरकारच्या योजनांच्या बळावर विधानसभेची निवडणूक लढवली गेली असल्यामुळे मुख्यमंत्रिपदावर शिंदे गटाचा दावाही भक्कम आहे. त्यामुळेच ‘युतीचा धर्म’ पाळण्याची आठवण भाजपला करून दिली जात आहे. परंतु शिंदेंच्या शिवसेनेचे केवळ ५७ आमदार निवडूण आले आहेत. त्यामुळे १३२ आमदार सोबत असलेला नेता मुख्यमंत्री बनणार की ५७ आमदार असलेला नेता?  मुख्यमंत्रिपदासाठी सर्वात मोठ्या पक्षाचा नेता निवडला जाणार की ‘युतीचा धर्म’ पाळला जाणार? हा मुख्य प्रश्न आहे.

मुख्यमंत्रिपदावर भाजप आणि शिवसेना या दोघांकडून दावे केले जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री करण्याची मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. महायुतीतील ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील, त्याच पक्षाचा मुख्यमंत्री असेल, असेही दरेकर म्हणाले. त्यातच ज्याच्या जास्त जागा, त्याचाच मुख्यमंत्री असा कोणताही निश्चित फॉर्म्युला  महायुतीनवे ठरवलेला नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

भाजप हा सर्वात जास्त जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे भाजपने मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला पाहिजे, अशी भावना भाजप कार्यकर्त्यांची आहे. त्यात देवेंद्र फडवणीस सर्वात पुढे आहेत.

भाजपने जिंकलेल्या जागांच्या संख्येने भाजपची नेतृत्वाची भूमिका निश्चित केलेली आहे, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. भाजपला १३२ जागा मिळालेल्या आहेत तर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळालेल्या आहेत.

विशेष म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच तूर्तास तरी मुख्यमंत्रिपदी कायम ठेवावे, अशा मतांचा एक वर्गही भाजप नेतृत्वात आहे. देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रीय राजकारणात उतरवले जाऊ शकते आणि जे.पी. नड्डा यांचे उत्तराधिकारी म्हणून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा त्यांच्यावर सोपवली जाऊ शकते, असे भाजपमधील या नेत्यांचे म्हणणे आहे.

काही भाजप नेतेच एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ असा तर्क सांगू लागले आहेत की, तो नाकारणे भाजपला महागात पडू शकते. द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून शिंदेंचा चेहरा घेऊनच निवडणुकीला सामोरे गेलेले असल्यामुळे शिंदेंना आता मुख्यमंत्रिपद नाकारले तर युतीतील घटक पक्ष म्हणून भाजपच्या प्रतिमेला नुकसान पोहोचू शकते, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे.

भलेही भाजप हा मोठा पक्ष असला तरी युतीतील घटक पक्षांनी भाजपवर विश्वास ठेवला पाहिजे. त्यामुळे आम्ही कुठलाही निर्णय घेण्याआधी दोनवेळा विचार करू. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये भाजपबद्दल अविश्वासाची भावना निर्माण होईल, अशी कोणतीही कृती भाजप नेतृत्व करणार नाही. कारण केंद्रात आम्ही युतीचे सरकार चालवत आहोत, असे हा नेता म्हणाला.

महायुतीत शिवसेनेला भाजपपेक्षा निम्म्यापेक्षाही कमी जागा मिळालेल्या असल्या तरी  एकनाथ शिंदे सरकारच्या कल्याणकारी योजना आणि उपायांमुळेच महायुतीच्या विजयासाठी पोषक वातावरण निर्मिती झाली, असा तर्कही शिंदेंच्या समर्थनार्थ दिला जात आहेत. त्याशिवाय शिंदेंनी महायुतीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. त्यांनी संपूर्ण राज्यात ७५ हून अधिक प्रचारसभा घेतल्या, असाही तर्क दिला जात आहे.

असे असले तरी भाजपला आपला मुख्यमंत्री बनवण्यासाठी निवडणुकीत १०० चा आकडा गाठण्याचे प्रयत्न करायला हवेत, असे पक्षाचे अंतर्गत नेतृत्व निवडणुकीच्या आधीपासूनच रणनिती आखत होते. ही विधानसभा निवडणूक देवेंद्र फडणवीसांच्या परतीसाठी आहे, असे संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीच्या आधीच दिले होते. आता भाजपच्या १०० पेक्षा अधिक म्हणजेच १३२ जागा निवडूण आलेल्या आहेत. त्यामुळे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.

या दोन्ही पक्षात अस्वस्थतेचे कारण म्हणजे या दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आपापले नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्र्याच्या रुपात पाहू इच्छित आहेत. आता भाजपच्या एवढ्या मोठ्या जागा निवडूण आल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता धूसर वाटू लागली आहे. एकामागोमाग एक भाजप नेते सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे, अशी भूमिका मांडू लागल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अस्वस्थता आणखीच वाढू लागली आहे.

भाजप नेत्यांकडून उघडपणे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरला जाऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, महायुतीचा धर्म आणि राजकीय शुचिता म्हणून आम्ही मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना पाहू इच्छितो. आम्ही या घडीला कोणत्याही शक्यता नाकारत नाही. बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, परंतु जेडीयूचे नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले गेले आहे, असे हा नेता म्हणाला.

शिंदे-फडणवीसांचे सावध मौन

मुख्यमंत्रिपदाबाबत अनेक शक्यता आणि तर्क लावले जाऊ लागले असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाबाबत मोकळेपणाने फारसे बोलताना दिसत नाहीत. जनादेश महायुतीच्या बाजूने असल्यामुळे आम्हाला मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही वाद-विवाद दिसत नाही. मुख्यमंत्रिपद आणि सरकारच्या स्थापनेचा निर्णय तिन्ही पक्ष एकत्र बसूनच घेतील. जो काही निर्णय घेतला जाईल, तो सर्वांना मान्य असेल, फडणवीसांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले. एकनाथ शिंदेंनेही असाच सूर आळवला. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीवरव दाखवलेल्या विश्वासामुळे आम्ही खुश आहोत. आम्ही सोबत राहू आणि महाराष्ट्रासाठी काम करू. ज्याप्रमाणे आम्ही एकत्र निवडणुका लढवल्या, त्याप्रमाणेच प्रमाणे खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही चर्चा करू आणि मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेऊ, असे एकनाथ शिंदे म्हणाले. दोघेही मुख्यमंत्रिपदाबाबत स्पष्ट बोलत नसल्यामुळे सस्पेन्स आणखीच वाढला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!