
मुंबईः मुंबई पोलिस आयुक्तालयाने प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबई पोलिस शिपाई भरती २०२४-२५ चा निकाल जाहीर केला असून तात्पुरती निवड यादी आणि प्रवर्गनिहाय कट-ऑफ मुंबई पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला आहे. या तात्पुरत्या यादीबाबत ज्या उमेदवारांना आक्षेप असतील, त्यांना २९ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत ई-मेलद्वारे आक्षेप नोंदवण्याची मुदत देण्यात आली आहे.
११ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२६ या कालावधीत मुंबई पोलिस शिपाई भरती २०२४-२५ ची मैदानी चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील विविध परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या भरतीचा निकाल बुधवारी रात्री (२७ मे) रोजी मुंबई पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या निकालात खुल्या प्रवर्गातील मुलांचा कट-ऑफ १३१ गुण तर मुलींचा कट-ऑफ १२५ गुण आहे. या भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी ९८७ जागा रिक्त आहेत.
मुंबई पोलिस शिपाई भरतीमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी ६६९ जागा असून ओबीसी मुलांचा कट-ऑफ १२७ तर मुलींचा कट-ऑफ ११९ गुण आहे. एसईबीसीसाठी ३५२ रिक्त जागा असून एसईबीसी मुलांचा कट-ऑफ १२८ आणि मुलींचा कट-ऑफ २१२ गुण आहे. ईडब्लूएससाठी ३५२ जागा रिक्त असून ईडब्लूएस मुलांच कट-ऑफ ११६ तर मुलींचा कट-ऑफ ९६ गुण आहे. अनुसूचित जातीसाठी (एससी) ४५८ जागा रिक्त असून एससी मुलांचा आणि मुलींचा कट-ऑफ अनुक्रमे १२३ तर मुलींचा कट-ऑफ ११६ गुण आहे. अनुसूचित जमातीसाठी (एसटी) २४६ रिक्त जागा असून एसटीच्या मुलांचा कट-ऑफ ११९ तर मुलींचा कट-ऑफ ११४ गुण आहे.
ही तात्पुरती निवड यादी ही निव्वळ शैक्षणिक अर्हता आणि इतर कागदपत्रे पडताळणीच्या अधीन राहून करण्यात आली आहे. त्यामुळे या निवड यादीत नावे आलेल्या उमेदवारांनी आपली अंतिम निवड झालेली आहे, असे समजू नये, असे स्पष्टीकरण मुंबई पोलिस आयुक्तालयाने दिले आहे.
या भरतीमध्ये महाराष्ट्र पोलिस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ मधील तरतुदीनुसार राष्ट्रीय छात्रसेना अर्थात एनसीसीचे ‘क’ प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार अधिकच्या (बोनस) पाच गुणांसाठी पात्र राहतील. त्यामुळे असे प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांना मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांमध्ये अधिकचे (बोनस) ५ गुण देण्यात आले आहेत. तात्पुरती निवड यादी व प्रवर्गनिहाय कट-ऑफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रवर्गनिहाय कट-ऑफ

आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत किती?
या तात्पुरत्या निवड यादीवर उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांना २७ मे रोजी रात्री ९ वाजेपासून ते २९ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत ईमेलद्वारे आक्षेप नोंदवता येणार आहेत. या निवड यादीवर आक्षेप नोंदवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी desk9recruitcell.mum@mahapolice.gov.in या ई-मेलवर आपले आक्षेप पाठवावेत. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, असे मुंबई पोलिस शिपाई भरती २०२४-२५ चे सचिव तथा पोलिस उपायुक्त (मुख्यालय-२) नितीन पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
