राज्यात वर्षभरात सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीच्या तब्बल ३ लाख ३२ हजार तक्रारी, तुमचीही फसवणूक झाल्यास साधा ‘या’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क


मुंबई:  महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. जानेवारी ते ‍‍डिसेंबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्र सायबर कार्यालयातील एनसीआरओ पोर्टल व सायबर हेल्पलाईन १९३० वर एकूण ३ लाख ३२ हजार ५३८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सायबर गुन्ह्यांतील फसवणुकीच्या रक्कमेपैकी ४४०.३७ कोटी रूपये वाचवण्यात महाराष्ट्र सायबर पोलिसांना आले आहे.

नॅशनल क्राईम रिर्पोंटिंग पोर्टलवर सन २०२४ मध्ये ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात मुंबई शहरात २,१५५,  पुणे शहरात १२५ व ठाणे शहरात ८६२ सायबर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर आर्थिक फसवणूक झालेल्या सायबर गुन्ह्यांमध्ये ८३८ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे व ९४२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.  संपूर्ण राज्यात एकंदरीत सायबर गुन्ह्यांमध्ये १ हजार ९३६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून त्यात १ हजार ९६७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

संगणक, लॅपटॉप, मोबाईल यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार ऑनलाईन होऊ लागल्याने शासनाने नागरिकांची होणारी फसवणूक थांबवण्याच्यादृष्टीने http://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर आणि टोल फ्री क्रमांक १९३० वर आर्थिक फसवणूक झाल्याबाबत तात्काळ तक्रार नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सायबर गुन्ह्यांवर वचक निर्माण करण्यासाठी नोडल सायबर पोलीस स्टेशन कार्यरत आहेत.  कमांड अँड कंट्रोल सेंटर अंतर्गत हेल्पलाईन १९३० आणि राज्यासाठी १९४५ हेल्पलाईन क्रमांकाद्वारे सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदणी आणि त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यात येत आहे.

सायबर फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास जलद गतीने होण्यासाठी तसेच भविष्यात अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यशासन विविध पातळ्यांवर काम करीत आहे.

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्यात ५० सायबर पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली असून जिल्हा, आयुक्त स्तरावर सायबर लॅबची स्थापना करण्यात येत आहे. कार्यान्वीत झालेल्या लॅबमध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच जागतिकस्तरावरील अत्याधुनिक आणि क्रांतिकारी उपक्रम महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात ५  हजार पोलिसांना सायबर तपास आणि प्रतिबंधात्मक उपायांसाठी प्रशिक्षित करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र सायबर गुन्हे विभागाच्या पोलीस उपमहानिरीक्षकांनी कळवले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!