मसाप निवडणूकः प्रतिभा अहिरे म्हणतात, ‘परिवर्तन मंचमध्ये प्रतिगामी विचारधारेचा लवलेशही नाही, झेंडा-दांड्याची भाषा ध्रुवीकरणासाठीच!’


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  मराठवाडा साहित्य परिषदेच्या (मसाप) कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत काही आंबेडकरवादी साहित्यिक-कवींनी आपला ‘विद्रोह’ आरएसएसच्या दावणीला बांधून आरएसएस-भाजपप्रणित परिवर्तन मंचची पताका खांद्यावर घेतली असल्याचे वृत्त शनिवारी न्यूजटाऊनने प्रकाशित केल्यानंतर महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळात खळबळ उडाली. त्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या असतानाच आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक असलेल्या डॉ. सर्जेराव जिगे नेतृत्व करत असलेल्या परिवर्तन मंच पॅनलच्या उमेदवार व प्रसिद्ध विद्रोही कवयित्री प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी आपली भूमिका न्यूजटाऊनकडे मांडली आहे. परिवर्तन मंच पॅनलने प्रतिगामी विचारधारेचा झेंडा हाती घेतलेला नाही. त्यांच्या जाहिरनाम्यात त्याचा लवलेशही नाही. झेंडा-दांड्याची भाषा निवडणुकीचे ध्रुवीकरण करण्यासाठीच केली जात असल्याचा असा दावा प्रा. डॉ. अहिरे यांनी केला आहे.

मराठवाडा साहित्य परिषद अर्थात मसापच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक आणि आरएसएस-भाजपप्रणित विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक डॉ. सर्जेराव जिगे हे परिवर्तन मंचचे पॅनलचे नेतृत्व करत असून त्यांच्या नेतृत्वात प्रसिद्ध विद्रोही कवयित्री प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे, आंबेडकरी कवि-लेखक प्रा. डॉ. सिद्धोधन कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. मोहन सौंदर्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त कवी- लेखक बबन मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर मसापच्या निवडणुकीत आरएसएसच्या दांड्यावर परिवर्तन मंचचा झेंडा, आंबेडकरवाद्यांचा विद्रोहही संघाच्या दावणीला?’ या मथळ्या खाली शनिवारी न्यूजटाऊनने विशेष वृत्त प्रकाशित केले आणि आंबेडकरी-परिवर्तनवादी साहित्य विश्व ढवळून निघाले. त्यावर साहित्य वर्तुळातून उलटसुटल प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. परिवर्तन मंच पॅनलमधील एक प्रमुख उमेदवार आणि विद्रोही कवयित्री प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

आवश्य वाचाः मसापच्या निवडणुकीत आरएसएसच्या ‘दांड्या’वर परिवर्तन मंचचा ‘झेंडा’, आंबेडकरवाद्यांचा ‘विद्रोह’ही संघाच्या दावणीला?

‘मराठवाडा साहित्य परिषद कार्यकारी मंडळ निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही निवडणूक कधीच पारदर्शक नव्हती व आताही होणार नाही. गेली तीस-अडतीस वर्षे एकाच मठाधिपती व त्यांच्या सोयीच्या माणसांनी मसापवर ‘ठिय्या’ मांडला आहे. मसापच्या कार्यकारी मंडळात जाऊन मला फार काही मोठा लाभ होणार आहे असे नाही. ही निवडणूक बिनविरोध होणार आहे, तुम्ही निवडणूक लढू नका असा संदेश मला आल्यानंतर या ठिय्या मारलेल्यांनी किमान निवडणूक प्रक्रियेतून जायलाच हवे या भूमिकेतून मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही,’ असे प्रा. डॉ. अहिरे यांचे म्हणणे आहे.

‘माझी फुले, शाहू, आंबेडकरी भूमिका सर्वश्रृत आहे. परिवर्तन पॅनलने प्रतिगामी विचारधारेचा झेंडा हाती घेतलेला नाही. त्यांच्या जाहिरनाम्यातही त्याचा लवलेशही नाही. तरी काही खोडसाळपणे झेंडा, दांड्याची भाषा करून या निवडणुकीचे ध्रुवीकरण करु पहात आहेत. मी अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन, पहिले अखिल भारतीय शिक्षक साहित्य संमेलन, आंतरराज्यीय विद्रोही साहित्य संमेलन आदी अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्या संमेलनांच्या अध्यक्षपदावरून मी माझी फुले, शाहू, आंबेडकरी सांस्कृतिक भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे,’असे अहिरे यांनी म्हटले आहे.

‘मसाप कार्यकारी मंडळाची निवडणूक बिनविरोध मी होऊ दिली नाही. विरोधकांकडे प्रचाराचा कोणताही मुद्दा नसल्याने काही प्रसार माध्यमांतून आंबेडकरी, विद्रोही साहित्य प्रवाहाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली असती तर कोणत्या विचारधारेचा विजय वा पराभव झाला असता? माझी भूमिका न जाणून घेता परस्पर एकांगी, खोडसाळ बातम्या पसरवण्यात येत आहे, असा आरोप करत महासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आरंभिलेल्या सांस्कृतिक युध्दातील मी एक सैनिक आहे, असे अहिरे यांनी म्हटले आहे.

प्रा. डॉ. अहिरे यांनी मसापवरही गंभीर आरोप करत म्हटले आहे की, ‘वर्तमान मसाप संवैधानिक चौकट मानणारी संस्था आहे, असा केवळ भास आहे. प्रत्यक्षात तिची कार्यप्रणाली लोकशाही स्वरूपाची नाही. निवडणूक, मतदारयादी, मतदान प्रक्रिया, मतपत्रिका संकलन, निर्वाचन अधिकाऱ्यांची नियुक्ती सगळीच एकाधिकारशाही आहे. आजपावेतो ज्या पद्धतीने सदस्य केले गेले ती पद्धतही सदोष आहे. साहित्य परिषदेच्या मतदारांसाठी वाचक, लेखक, समीक्षक असणे असा निकष असावयास हवा, मात्र तेथे वयाचा निकष ठेवण्यात आलेला आहे,’

‘वर्षानुवर्षे काही विशिष्ट व्यक्तींच्या हाती मसाप अंकीत आहे. कंपुगिरी, लॉबिंग सुरू आहे. नैवेद्य दाखवावा तसे दलित, वंचितातील काही सदस्य जवळ बाळगलेले असतात. परिघाबाहेरील प्रतिभावंताना, नवीन कवी, लेखकांना सामावून घेतले जात नाही. संधी दिली जात नाही. निवडणुकीत संवैधानिक पद्धतीने आदर्श आचारसंहिता  अवलंबली जात नाही. आरक्षणाचे तत्व लागू केले जात नाही. अशा पद्धतीने मतदार केले आहेत की त्या ठराविक कंपूखेरीज इतर कुणीही मसापमधे निवडून येऊच शकणार नाहीत,’ असे प्रा. डॉ. अहिरे यांचे म्हणणे आहे.

‘एकूणच लोकशाहीच्या मूल्यांना बासनात गुंडाळून गेली अनेक वर्षे हा असाहित्यिक व्यवहार मग्रुरीने सुरू आहे. निवडणुकीस इच्छूक उमेदवारांना त्यांच्या कामाच्या  ठिकाणी जाऊन धमकावले जाणे, तुला दहाच मतं मिळतील असे हतोत्साहीत करणे, आचारसंहितेला कोलून कार्यक्रम लावणे या सर्व असंवैधानिक बाबींना प्रश्न विचारणे गरजेचे नाही काय?  मी ठामपणे फुले, शाहू, आंबेडकरी भूमिका जगणारी कवी, लेखक आहे. निवडणूक, पद, पुरस्कार, सत्कार याचं कोडकौतुक मला नाही. पण भूमिकेची  साहित्यिक माणसं बाहेर राहिल्यानं या असाहित्यिक प्रवृत्तींना मोकळं रान मिळतय,’ असेही अहिरे यांचे म्हणणे आहे.

मसापचा मतदार किती काळ विकल्या गेल्याप्रमाणे कोऱ्या मतपत्रिका ताब्यात देणार? असा सवाल करत हारजित महत्वाची नाही. पण ही एकाधिकारशाही, हे साचलेपण, हा दुजाभाव संपवला पाहिजे. ही लाभाची पद नाहीत. म्हणून निर्भय व्हा आणि आपल्या स्वतःचे मत द्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

…पण तरीही हे प्रश्न अनुत्तरीतच!

प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी न्यूजटाऊनच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडली. ही भूमिका मांडत असताना त्यांनी ‘परिवर्तन मंच’ असे पॅनेलचे मूळ नाव असूनही तो उल्लेख टाळत परिवर्तन पॅनल असा उल्लेख केला आहे. त्यांनी ही भूमिका मांडली असली तरी काही प्रश्नांची उत्तरे त्यांच्या भूमिकेतून स्पष्टपणे मिळालेली नाहीत. ते प्रश्न असे-

  • डॉ. सर्जेराव जिगे हे आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक आणि आरएसएसप्रणित विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक असल्याचे माहीत असूनही त्यांचे नेतृत्व प्रा. डॉ. प्रतिभा अहिरेंसह अन्य आंबेडकरी कवी-लेखकांनी का स्वीकारले?
  • संघाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात हा सार्वत्रिक अनुभव असल्यामुळे ज्या परिवर्तन मंच पॅनलचे नेतृत्वच आरएसएसची विचारधारा नखशिखांत जोपासणारा कट्टर स्वयंसेवक करतो, त्या पॅनलने प्रतिगामी विचारधारेचा झेंडा हाती घेतला नाही, हा दावा कितपत विश्वासार्ह मानायचा?
  • मसापच्या निवडणुकीत आरएसएस व त्यांच्या यंत्रणेची मदत घेऊ असे परिवर्तन मंच पॅनलचे प्रमुख डॉ. सर्जेराव जिगे स्वतःच सांगतात, आरएसएसची अशी मदत या चारही आंबेडकरी कवी-लेखक, प्राध्यापकांच्या विवेकाशी ‘समरस’ होणार आहे का?
  • मसापमधील कथित कंपुगिरी आणि एकाधिकारशाही मोडित काढण्यासाठी आंबेडकरी, परिवर्तनवादी साहित्यिक-लेखकांनी समविचारी बहुजनांना सोबत घेऊन स्वतंत्र पॅनल उभे करण्याचा प्रयत्न का केला नाही? त्यासाठी आरएसएस-भाजपप्रणित नेतृत्वाचीच निवड का केली? या प्रश्नांची उत्तरेही प्रा. डॉ. प्रतिभा अहिरेंसह अन्य तिघेही आंबेडकरी उमेदवारांनी द्यावीत, असे त्यांना न्यूजटाऊनचे जाहीर आव्हान आहे.
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!