मुला-मुलींना ‘एकांता’ची व्यवस्था करणाऱ्या कॅफेवर संभाजीनगर पोलिस-मनपाची धडक कारवाई, २९ कॅफेमधील ‘प्रायव्हसी कम्पार्टमेंट्स’वर हातोडा!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅफे आणि कॉफी शॉप्स अश्लील चाळ्यांचे अड्डे बनले आहेत. ठराविक रक्कम आकारून प्रायव्हसीच्या नावाखाली मुले-मुली आणि शाळकरी विद्यार्थ्यांना ‘प्रायव्हसी कम्पार्टमेंट’;rस्वतंत्र व्यवस्था करून देणाऱ्या २९ कॅफेवर आज छत्रपती संभाजीनगर पोलिस आणि महानगरपालिकेने धडक कारवाई केली. या कॅफेमध्ये अनधिकृत बांधकाम करून निर्माण केलेले कम्पार्टमेंट तोडून टाकण्यात आले आहेत.

शहरातील अनेक कॅफेच्या आत अनधिकृत बांधकाम करून त्या ठिकाणी मुली-मुले तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी एकांत मिळण्यासाठी कॅफेचालक हे कम्पार्टमेंट तयार करून जागा उपलब्ध करून देत आहेत व त्या ठिकाणी गैरप्रकार होत आहेत, अश्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झालेले होत्या.

 या तक्रारींची दखल घेत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या संवेदनशील विषयावर दोन महिन्यांपासून शोध मोहीम हाती घेतली होती. या शोध मोहिमेत मुलामुलींना ‘प्रायव्हसी’साठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून देणारे २९ कॅफे आयडेंटीफाय करण्यात आले होते.

या आयडेंटिफाय झालेल्या कॅफेवर आज पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस व महानगरपालिकेने संयुक्तपणे धडक कारवाई करत २९ कॅफेमध्ये तयार करण्यात आलेले कम्पार्टमेंट तोडून टाकण्यात आले आहेत.

बहुतांश कॅफे ट्यूशन हब, कॉलेज परिसरात

पोलिस आणि महानगरपालिकेच्या पथकाने संयुक्तपणे ज्या कॅफेविरुद्ध कारवाई केली, त्यातील बहुतांश कॅफे हे ट्यूशन हब आणि महाविद्यालयांच्या परिसरातील आहेत. उस्मानपुरा, एसएससी बोर्ड, संत एकनाथ रंग मंदिर परिसर, कोकणवाडी चौक हा परिसर ट्यूशन हब म्हणून ओळखला जातो. या भागात नीट, जेईई, दहावी-बारावीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे कोचिंग क्लासेस चालतात. या भागातील तब्बल १८ कॅफेमधील प्रायव्हसी कम्पार्टमेंट्सवर हातोडा चालवण्यात आला आहे.

या कॅफेमध्ये होते ‘प्रायव्हसी’ कम्पार्टमेंट्स

  • ड्रॉप आऊट कॅफे, एसएससी बोर्डाजवळ, पीर बाजार चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर.
  • एके-४७ कॅफे, रमानगर स्मशानभूमीजवळ, उत्सव चौक.
  • एमएच-२० कॅफे, अजबनगर
  • हॉलीडे कॅफे, अजबनगर
  • फ्रेंड्स कॅफे, एस.बी. कॉलेजजवळ, औरंगपुरा.
  • आर्मर फ्रिडीम हाऊस कॅफे, यश मंगल कार्यालयाच्या समोर, उस्मानपुरा.
  • गोल्डन अवर कॅफे, संत एकनाथ रंग मंदिराच्या समोर, उस्मानपुरा.
  • रॉयल कॅफे, संत एकनाथ रंग मंदिराच्या समोर, उस्मानपुरा.
  • कॅफे विथ मी, हॉटेल किजच्या समोर, रेल्वे स्टेशन रोड, वेदांतनगर.
  • कॅफे रेन्बो, रॉयल एन्फिल्ड शोरूमच्या बाजूला, रेल्वे स्टेशन.
  • कॅफे सेव्हन वंडर, विट्स हॉटेलजवळ, रेल्वे स्टेशन रोड.
  • हाईड अँड सिक कॅफे, दशमेश नगर, उस्मानपुरा.
  • जेल कॅफे, एसएससी बोर्डाजवळ, उस्मानपुरा.
  • लॉक पर्ल कॅफे, कोकणवाडी चौक.
  • कॅफे व्हर्जीन बाईट, कोकणवाडी चौक.
  • कॅफे ब्ल्यूम, कोकणवाडी चौक.
  • ओमनी फिक कॅफे, कोकणवाडी चौक.
  • कॅफे रॉयल डे, देवगिरी कॉलेज रोड.
  • कॅफे मुन लाईट, संत एकनाथ रंग मंदिरासमोर, उस्मानपुरा.
  • कॅफे वुडीज, दशमेश नगर.
  • मी आणि तू कॅफे-१, कॅनॉट प्लेस, सिडको.
  • मी आणि तू कॅफे-२, कॅनॉट प्लेस, सिडको.
  • अर्बन बाईट कॅफे, कॅनॉट प्लेस, सिडको.
  • गॉडसन कॅफे, कॅनॉट प्लेस, सिडको.
  • ब्लश कॅफे, कॅनॉट प्लेस, सिडको.
  • इलू कॅफे, कॅनॉट प्लेस, सिडको.
  • रोझवूड कॅफे, कॅनॉट प्लेस, सिडको.
  • टेबल टाक कॅफे, गोल्डन सिटी सेंटर, प्रोझोन मॉलजवळ.
  • कॅफे विथ मी, उस्मानपुरा.

पोलिसांशी संपर्क साधा, गैरकृत्याची माहिती द्या

मुली आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली असून यापुढेही अशा प्रकारची कारवाई सातत्याने सुरूच राहणार आहे. शहरात कुठेही अश्या प्रकारचे गैरकृत्य होत असल्यास ११२ क्रमांक डायल करा किंवा महिला हेल्प लाईन क्रमांक १०९१ किंवा पोलिस नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२४०-२२४०५०० वर संपर्क साधून माहिती द्या, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!