छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): मराठवाडा साहित्य परिषदेच्या (मसाप) निवडणुकीत उतरलेल्या परिवर्तन मंच पॅनलचे प्रमुख प्रा. डॉ. सर्जेराव जिगे हे ज्या ‘विचारधारे’त वावरतात, जी विचारधारा त्यांनी अंगीकारलेली आहे, त्या विचारधारेने ‘परिवर्तन’ हा शब्द वापरणे हाच मोठा विनोद आहे, असा टिकास्त्र मसाप संस्थासंवर्धक अराजकीय पॅनलचे प्रमुख आणि मसापचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी सोडले आहे. परिवर्तन मंच पॅनलकडून केले जाणारे आरोप निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचेही ठाले- पाटील यांनी म्हटले आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या (मसाप) कार्यकारी मंडळाच्या पंच वार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून या निवडणुकीत मसापचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या नेतृत्वात मसाप संस्थासंवर्धक अराजकीय पॅनल आणि आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक प्रा. डॉ. सर्जेराव जिगे यांच्या नेतृत्वात आंबेडकरवादी कवि-लेखकांना हाताशी धरून आरएसएसप्रणित परिवर्तन मंच पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रविवारी डॉ. सर्जेराव जिगे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाले-पाटलांच्या नेतृत्वातील मसापवर आरोप केले आहेत. त्याआधी परिवर्तन मंचच्या उमेदवार व प्रसिद्ध विद्रोही कवि प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे आणि प्रा. डॉ. सिद्धोधन कांबळे यांनीही मसाप व ठाले-पाटलांवर आरोप केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाले-पाटील यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.
‘निवडणुकीच्या प्रक्रियेच्या काळात असे आरोप प्रत्यारोप होतच असतात, हे मी समजू शकतो. पण शक्यतो प्रत्यारोप करायचे नाही, उत्तर द्यायचे नाही असे मी ठरवले होते. पण आता हे अतिच होते आहे म्हणून अगदी थोडक्यात निवडणुकीतील, संस्थावर्धक पॅनलचा प्रमुख म्हणून मी माझे म्हणणे देत आहे’, असे सांगत ठाले-पाटील यांनी आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक डॉ. जिगे व त्यांच्या परिवर्तन मंच पॅनलवर पलटवार केला आहे.
अभ्यास मंडळाचे अध्यक्ष मिळवणे वेगळे, आणि…
‘काही लोकांना सरकारच्या कृपेने नियुक्त्या करून घेऊन काही सत्तापदे मिळत असतात. पण सगळ्याच ठिकाणी हे शक्य नसते. सरकारकडून नियुक्त्या करून घेऊन विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष होणे वेगळे आणि निवडणूक लढवून मराठवाडा साहित्य परिषद किंवा अन्य दुसऱ्या संस्थेत निवडून येणे वेगळे’, असा टोला ठाले-पाटील यांनी डॉ. जिगे यांना लगावला आहे.
आरोप नैराश्य आणि वैफल्यातून
‘निवडणुकीत मतदार हा महत्त्वाचा असतो. मतदारांनी प्रतिसाद नाकारला की, विरोधी पॅनलवर, त्याच्या प्रमुखांवर किंवा उमेदवारांवर हमखास असे आरोप केले जातात. घटनाबाह्य मागण्या केल्या जातात. त्यात तथ्य नसते व ते शक्यही नसते हे कळत असूनही आरोप सतत वेगवेगळ्या नावांनी सुरूच असतात. यापाठीमागे मतदारांनी प्रतिसाद न दिल्यामुळे आलेले नैराश्य व वैफल्य फक्त असते हे मला कळते’, असे ठाले-पाटील यांनी म्हटले आहे.
कोणी कोठे असावे हा ज्याचा त्याचा प्रश्न
‘वस्तुत: ज्या ‘विचारधारे’त प्रा. जिगे वावरतात, जी विचारधारा त्यांनी अंगिकारलेली आहे. त्या विचारधारेने ‘परिवर्तन’ हा शब्द वापरणे हाच मोठा विनोद आहे. अर्थात याचा विचार त्यांच्या सहकारी उमेदवारांनी करावयाचा आहे. कोणी कोठे असावे हा ज्याचा त्याचा मुद्दा आहे, त्यावर मी बोलणार नाही. निवडणुकीतील उमेदवार म्हणून त्यांनी संस्थावर्धक अराजकीय पॅनलविरुद्ध अशी पत्रके काढण्याऐवजी व सनसनाटी बातम्या देण्याऐवजी मतदारांची सहानुभूती व प्रतिसाद मिळवण्याला प्राधान्य द्यावे, असा सल्लाही ठाले-पाटील यांनी परिवर्तन मंच पॅनलला दिला आहे.
प्रतिसाद न मिळाल्यामुळे वैफल्य आणि निराशा
‘त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह मतदारांना भेटण्यासाठी व त्यांची मते मिळवण्यासाठी जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड असा मराठवाडाभर निवडणूक प्रचारासाठी एकत्र दौरा केला हे सर्वज्ञात आहे. त्यात काही चूकही नाही. पण या दौऱ्यात मतदाराचा फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन ते व त्यांचे एक दोन सहकारी निराशेपोटी असे निराधार आरोप करीत आहेत याशिवाय त्यांच्या म्हणण्यात कोणतेही तथ्य नाही. एवढेच याबद्दल मला सांगावयाचे आहे’, असेही ठाले-पाटील यांनी म्हटले आहे.