रयत मराठ्यांनो! निजामी मराठ्यांचा नाद सोडा, स्वतःच्या ताकदीवर उभे रहा; तरच आरक्षण मिळवू शकालः प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य


मुंबईः  जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेले आमरण उपोषण आणि या उपोषणादरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीमार यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची रयत मराठा आणि निजामी मराठा अशी विभागणी करत रयत मराठ्यांना निजामी मराठ्यांच्या मागे न जाता स्वतःच्या ताकदीवर उभे राहण्याचे आवाहन केले आहे. रयत मराठे स्वतःच्या ताकदीवर उभे राहिले तरच स्वतःला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळवू शकतील, असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. प्रकाश आंबेडकरांनी काही दिवसांपूर्वीच आंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेतली आणि उपोषणाला पाठिंबा जाहीर केला. त्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी एक ट्विट केले आहे.

‘गेली काही वर्षे सातत्याने रयत मराठ्यांना त्यांची आरक्षणाची रास्त मागणी मिळवून देण्यात तथाकथित मराठा नेतृत्व अपयशी ठरले आहे. रयत मराठ्यांनो, स्वतःच्या ताकदीवर उभे रहा. निजामी मराठ्यांच्या मागे जाऊ नका. तरच तुम्ही स्वतःसाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळवू शकाल,’ असे प्रकाश आंबेडकर यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला असताना एकनाथ शिंदे, शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण या तथाकथित मराठा नेत्यांना किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सत्तेत असणाऱ्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयात गरीब मराठ्यांसाठी आरक्षण का टिकवता आले नाही?’ असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

आंतरवालीला भेटी आणि पोकळ आश्वाने ही नौटंकी

‘त्यांची आंतरवाली सराटी येथे भेट आणि त्यांची पोकळ आश्वासने ही सर्व नौटंकी आहे. तसे नसते तर त्यांनी ‘रयत मराठ्यांसाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण’ या न्याय्य मागणीसाठी प्रयत्न केले असते. ताकदी उभी केली असती, धोरण बदलायला भाग दडपण आणले असते,’ असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

..त्यांच्या भेटीमुळे ओबीसी-रयत मराठ्यांत तणाव

‘उलट निजामी मराठा नेत्यांच्या भेटीमुळे ओबीसी आणि रयत मराठ्यांमध्ये तणाव वाढला आहे. सर्व रयत मराठ्यांना माझे आवाहन आहे की, यातून दंगल न घडवताही मार्ग निघू शकतो. निवडणुकीत जाती आधारित नाही तर मानवी मूल्यांवर, न्याय मागण्यांसाठी भूमिका घ्या. याच मार्गाने आपल्या आरक्षणाची मागणी कोणत्याही समाजाला न दुखावता प्रभावी पद्धतीने पुढे रेटता येईल,’ असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *