डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ, २४ तासांत १२० सुरक्षा रक्षकांचा खडा पहारा; तरीही सुरक्षा वाऱ्यावरच!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीलगतच असलेल्या विहिरीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली असून विद्यापीठ परिसरात २४ तासात १२० सुरक्षा रक्षकांचा खडा पहारा असूनही विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावरच असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे विद्यापीठात तैनात असलेली खासगी सुरक्षा व्यवस्था तकलादू असल्याचे २०२३ मध्येच स्पष्ट झाले होते. त्यातून विद्यापीठ प्रशासनाने कोणताच धडा घेतला नसल्याचे या घटनेने अधोरेखित केले आहे.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील रस्त्यापासून ५० फूट अंतरावरील झाडाच्या खाली एक अर्धवट बुजलेली विहीर आहे. या विहिरीतून रविवारी सकाळी प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. विद्यापीठ परिसरात नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांच्या लक्षात रविवारी सकाळी ही बाब आली. या नागरिकांनी ही बाब विद्यापीठ परिसरातील सुरक्षा रक्षकांना सांगितली. सुरक्षा रक्षकांनी विहिरीची पाहणी केली असता त्यांना विहिरीत मृतदेह तरंगताना दिसला. विहिरीत मृतदेह पाहिल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांना दिली.

हेही वाचाः ‘डॉ. बामु’ परिसराचे अभाविपकडून विद्रुपीकरण, महापुरूषांच्या नामफलकांचीही विटंबना; विद्यापीठ प्रशासनाचा मात्र कानाडोळा!

सुरक्षा रक्षकांकडून माहिती मिळताच बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पदमपुरा येथील अग्नीशमन दलाचे पथक बोलावण्यात आले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून विहिरीतील मृतदेह बाहेर काढून तो पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी हा मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवला.

हा मृतदेह किमान दोन दिवसांपासून विहिरीत पडून असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृतदेहाची तपासणी केली असता त्यावर कोणत्याही प्रकारचे व्रण, जखमा किंवा खुणा आढळून आलेल्या नाहीत. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार असल्याचे पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी पत्रकारांना सांगितले.

हेही वाचाः फुले-आंबेडकरांच्या नामफलकाची विटंबनाः अभाविपच्या कार्यकर्त्यांची आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून यथेच्छ धुलाई, उद्या विद्यापीठ बंदची हाक

पोलिसांकडून सध्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृत व्यक्ती कोण आहे? ती विद्यापीठातील विद्यार्थी आहे की बाहेरची व्यक्ती आहे? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. विशेष म्हणजे मृतदेहाच्या खिशात मोबाइल, पाकिट किंवा ओळखपत्र असे काहीही आढळून आलेले नाही. त्यामुळे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ही आत्महत्या आहे की घातपात? या दोन्ही शक्यता लक्षात घेऊन पोलिस तपास करत आहेत.

१२० सुरक्षा रक्षकांवर लाखोंचा खर्च तरीही व्यवस्थाच तकलादू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात २४ तासांत १२० सुरक्षा रक्षकांचा पहारा असतो. त्यात विद्यापीठाच्या सेवेत असलेल्या ५ आणि बाह्यस्त्रोतांकडून घेतलेल्या ११५ खासगी सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. ३५ सुरक्षा पाँइंट्सवर तीन शिफ्टमध्ये ही खासगी सुरक्षा यंत्रणा तैनात असते. . त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून खासगी सुरक्षा एजन्सी दरवर्षी लाखो रुपये मोजले जातात.

हेही वाचाः आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून यथेच्छ धुलाई आणि विटंबनेचा गुन्हा दाखल होताच अभाविपची कल्टी; पण ‘हे’ प्रश्न अनुत्तरीतच!

विद्यापीठ परिसरातील वसतिगृहात विद्यार्थी व विद्यार्थिनीही मोठ्या संख्येने राहतात. कुलगुरू डॉ. विजय फुलारींसह काही प्राध्यापक आणि कर्मचारीही  विद्यापीठ परिसरातच राहतात. शिवाय विद्यापीठ परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळेही आहेत. ज्या विहिरीत रविवारी मृतदेह आढळला ती विहिरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून काही अंतरावरच आहे.

अशा संवेदनशील परिसरात २४ तास खासगी सुरक्षा सरक्षकांचा पहारा असतानाही या मुख्य प्रशासकीय इमारतीलगच असलेल्या विहिरीत मृतदेह कसा आढळला? ही घटना घडली तेव्हा विद्यापीठ परिसरात तैनात असलेले खासगी सुरक्षा काय करत होते?, खासगी सुरक्षा रक्षकांची ही व्यवस्था केवळ देयके अदा करण्यापुरतीच आहे का? असे गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

विशेष म्हणजे यापूर्वी १६ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्रीच्या वेळी आरएसएस-भाजपची विद्यार्थी आघाडी असलेल्या अभाविपच्या कार्यकर्त्यांनी खासगी सुरक्षा रक्षकांची ‘नजर चुकवत’ विद्यापीठ परिसरात येऊन म. जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख असलेल्या फलकांची विटंबना करत त्यावर ‘एबीव्हीपी’ अशी अक्षरे स्पे पेंटिंगने लिहिली होती. तेव्हाच विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु त्यातून विद्यापीठ प्रशासनाने कोणताच धडा घेतल्या नसल्याचे रविवारच्या घटनेने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!