शिवसेनेशी युती का केली?, प्रकाश आंबेडकरांनी सांगितले कारण; ‘वंचित’ महाविकास आघाडीत असेल का? ठाकरे म्हणाले…


मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात गेली काही दिवस चर्चेचा विषय ठरलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर आज अखेर शिक्कामोर्तब झाले. या ऐतिहासिक युतीचे महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होतील, असे राजकीय जाणकारांना वाटते. मात्र प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेशी युती का केली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खुद्द प्रकाश आंबेडकरांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले आणि एमआयएमने वंचित बहुजन आघाडीची चळवळ गिळंकृत करण्याचा प्रयत्न केल्याचा थेट आरोपच त्यांनी एमआयएमचे नाव न घेता केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. यावेळी प्रकाश आंबेडकारांनी भूमिका मांडली. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना एकत्र आल्याने निवडणुकीत बदलाचे राजकारण सुरू होणार आहे. उपेक्षितांना संधी देऊन त्यांची लिडरशिप उभी करण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत युती केली, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचाः मोठी बातमीः शिवसेना- वंचित बहुजन आघाडीची युती, उद्धव ठाकरे- प्रकाश आंबेडकरांची घोषणा

याआधी झालेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात युती झाली होती. नंतरच्या विधानसभा निवडणुकीत मात्र ही युती तुटली. आजच्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी त्यावरही भाष्य केले.

गेली अनेक वर्षे उपेक्षितांचे राजकारण सुरू होण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. ही चळवळ आम्ही चालवत होतो. तिला आमच्या मित्र पक्षाने गिळंकृत किंवा मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही न जुमानता आंदोलन करत राहिलो, लढत राहिलो. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना एकत्र आल्याने निवडणुकीत बदलाचे राजकारण सुरू होणार आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. एमआयएमने वंचित बहुजन आघाडीची चळवळ गिळंकृत करण्याचा प्रयत्न केल्याचा थेट आरोपच त्यांनी एमआयएमचे नाव न घेता केला.

प्रादेशिक पक्षांची लिडरशिप तयार करण्याचा प्रयत्न असेल तर आमचा पाठिंबा असेल. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी उपेक्षितांना संधी देईल, लिडरशिप उभी करेल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

शरद पवारांशी भांडण शेतातले नाही, मुद्द्यांचे

ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीत होत असलेल्या युतीविषयीची शरद पवार यांची प्रतिक्रिया मी वाचली. ही प्रतिक्रिया नवीन नाही. आमच्या दोघांचे भांडण फार जुने आहे. हे शेतातले भांडण नाही तर नेतृत्व आणि कोणत्या दिशेने जायचे याचे भांडण आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार आमच्या सोबत येतील अशी अपेक्षा मी बाळगतो, कारण य लढ्याकडे मी वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

नरेंद्र मोदींच्याही एक दिवस नेतृत्वाचा अंत

 राजकारणात कोणीही अमरपट्टा घेऊन आलेले नाही. एक दिवस नरेंद्र मोदी यांच्याही नेतृत्वाचा अंत होणार आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातील लिडरशिप संपवली आहे. फक्त फाईली उचलून घेऊन जायचे आमचे काम आहे, असे त्यांच्यातले अनेक मंत्री म्हणतात. आज ईडीच्या माध्यमातून राजकीय नेतृत्व संपवण्याचे प्रयत्न होत आहेत, असे आंबेडकर म्हणाले.

‘वंचित’ महाविकास आघाडीचा भाग असेल का?

शिवसेना- वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा झाल्यानंतर शिवसेना हा महत्वाचा घटक पक्ष असलेल्या महाविकास आघाडीचा वंचित बहुजन आघाडी घटक असेल का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीबरोबर येण्यास कोणाचीही हरकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आम्ही महाविकास आघाडीचा निर्णय घेतला तेव्हा शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस एकत्र येतील का?  अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर आमच्यावर विचित्र आरोप झाले. त्या सर्वांना आम्ही पुरून उरलो. साधारण अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार आम्ही यशस्वीपणे चालवून दाखवले. मुळात हेतू चांगला असेल तर पुढच्या सर्व गोष्टी चांगल्या होतात असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आम्हाला काल रात्री स्वप्न पडले आणि आज आम्ही एकत्र आलो असे झालेले नाही. यापूर्वी आमच्या बैठका झाल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरही आमची चर्चा झाली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येण्यास कोणाचीही हरकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!