मुंबई: अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सन १९८०-८१ मध्ये करण्यात आले आहे. या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले असून त्याची दुरूस्ती आणि पुनर्बांधणी आवश्यक आहे. यामुळे रूग्णालयाची सहा मजल्यांची नवीन इमारत उभारण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
जिल्हा रुग्णालयाच्या जागेतच नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. महाविद्यालय प्रशासन आणि जिल्हा रुग्णालयात झालेल्या करारानुसार तीन वर्षापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाला रुग्णालयातील रुग्णसेवा, पायाभूत सुविधा उपयोगात आणता येणार आहेत. कराराच्या तीन वर्षानंतर वैद्यकीय महाविद्यालय उसर येथे होईल. तोपर्यंत रूग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
संरचनात्मक परीक्षणानुसार इमारतीचे डागडुजीचे काम सध्या सुरू आहे. इमारतीच्या ५८ खांबांपैकी १७ खांब काढून पूर्णपणे नवीन करण्यात आले आहेत. इतर खांबांचे काम पुढील काळात करण्यात येणार आहे. दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सहा मजल्यांची इमारत बांधण्यात येईल, अशी माहितीही चव्हाण यांनी दिली. या चर्चेत सदस्य जयंत पाटील, प्रवीण दरेकर, डॉ.मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.