मुंबईः विधानसभा निवडणुकीच्या कामकाजामुळे ज्या शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात शिक्षक नसतील अशा शाळांना १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावरून सुट्टी जाहीर करता येईल, असे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्याच्या शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे राज्यातील काही शाळा आजपासून सलग सहा दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील जिल्हा परिषदा आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळांबरोबरच अनुदानित शाळांमध्ये मतदान केंद्रे उभारली जातात. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या या कामासाठी शाळांचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यांचे वेळोवेळी निवडणूक कामकाजाचे प्रशिक्षणही होत आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या एक शिक्षकी, द्विशिक्षकी आणि कमी शिक्षक असलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळांबरोबरच अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.
२० नोव्हेंबर रोजी मतदान असले तरी निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १८ तारखेपासूनच सक्रीय व्हावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडे पाठवला होता. त्यावर सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावरून घ्यावा, अशा सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी दिल्या आहेत.
राज्यात विधानसभा निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबत आपण आपल्यास्तरावरून आवश्यक त्या सूचना जारी कराव्यात असे महाजन यांनी शिक्षण आयुक्तांना परिपत्रकाद्वारे कळवले आहे.
आज (१५ नोव्हेंबर) गुरू नानक जयंती असल्यामुळे राज्यातील सर्व शाळांना सुट्टी आहे. शनिवारी (१६ नोव्हेंबर) रोजीही राज्यातील अनेक शाळांना सुट्टी असते. १७ नोव्हेंबरला रविवार असल्यामुळे साप्ताहिक सुट्टी आहे. त्यानंतर निवडणुकीच्या कामकाजानिमित्त १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीतही सुट्टी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यातील काही शाळा सलग सहा दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.