मुंबईः महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेला ‘बटेंगे तो कटेंगे’ नारा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘एक है तो सेफ है’ या नाऱ्यावर भाजप आणि महायुतीतच मेळ नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या नाऱ्यावरून खुद्द भाजपच्याच नेत्यांमध्ये एकमत नाही तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही वेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे हे नारे देऊन मतांचे ध्रुवीकरण करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाण्याचीच शक्यता दिसू लागली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ या घोषणा देऊनच सत्ता मिळवल्यानंतर भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीतही याच घोषणा देऊन सत्ता मिळवली. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या दोन घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देताना दिसत आहेत. मात्र त्यावरून खुद्द भाजपमध्येच एकमत नाही. महायुतीचे नेतेही वेगळी भूमिका मांडू लागले आहेत.
अशोक चव्हाणः भाजप नेते अशोक चव्हाण आणि पंकजा मुंडे यांनाही हा नारा देणे आवडलेले नाही. ‘मी माझ्या कामावर विश्वास ठेवतो. मी सेक्युलर आहे. मी भाजपात असलो तरीही सेक्युलर हिंदू आहे. मी मला हिंदुत्वापासून वेगळे केलेले नाही, पण मी सेक्युलर हिंदू आहे. संविधानही हेच सांगते. भाजपमध्ये ही विचारसरणी आहे की आम्ही हिंदू आहोत पण तरीही भाजपमध्ये सेक्युलर असूनही हिंदुत्व मानणारेही लोक आहेत,’ असे भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
पंकजा मुंडेः भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी तर महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणांची गरजच नाही, असे स्पष्टपणे सांगून टाकले आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणांची महाराष्ट्रात गरज नाही. त्याऐवजी विकासाचे मुद्दे मांडले पाहिजेत. महाराष्ट्रात अशा घोषणा नकोत. मी भाजपमध्ये आहे म्हणून बटेंगे तो कटेंगे या घोषणेचे समर्थन करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपचेच नेते भाजपच्याच घोषणेशी सहमत नसल्याचे दिसून येत आहे.
अजित पवारः महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही वेगळी भूमिका मांडली आहे. बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्रात चालणार नाही. ते तिकडे उत्तरेकडेच चालवायचे. महाराष्ट्र हा शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. इतर राज्यांची महाराष्ट्राशी तुलना होऊच शकत नाही. महाराष्ट्रातील जनतेने कायम सलोखा ठेवला आहे. त्यामुळे बाहेरचे लोक येतात आणि त्यांचा विचार बोलून जातात. मात्र महाराष्ट्राने हा विचार मान्य केलेला नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे.