
मुंबईः महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यापैकी नेमकी कोणाची सत्ता येणार? याबाबत लोकांना कमालीची उत्सुकता असून लोकपोलने केलेल्या सर्वेक्षणात महाविकास आघाडीची सत्ता येण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीला १५१ ते १६२ जागा तर महायुतीला केवळ ११५ ते १२८ जागा मिळतील, असा निष्कर्ष लोकपोलच्या या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.
लोकपोलने महाराष्ट्रातील सर्व २८८ मतदारसंघात एक महिन्यापेक्षा जास्त काळ सर्वेक्षण केले आहे. लोकपोलने या प्रत्येक मतदारसंघातील सुमारे ३०० म्हणजेच एकूण ८६ हजार ४०० लोकांचे सर्वेक्षण केले आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १५१ ते १६२ जागा मिळतील, असे निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढण्यात आले आहे. महाविकास आघाडीला ४३ ते ४६ टक्के मते मिळतील, असे लोकपोलच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात.
भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला ११५ ते १२८ जागा मिळतील, असा निष्कर्ष लोकपोलच्या या सर्वेक्षणातून काढण्यात आला. महायुतीला ३७ टक्के ४० टक्के मते मिळतील तर अपक्ष व इतरांना ५ ते १४ जागा मिळतील आणि अपक्षांच्या व इतरांच्या खात्यात १६ ते १९ टक्के मते जातील, असे या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात.
काय सांगते महाराष्ट्राची हवा?
धुव्रीकरणाचा प्रयत्न महायुतीच्या अंगलटः महाराष्ट्रातील मतदारांचे धुव्रीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न महायुतीच्या अंगलट येताना दिसत आहे. महाराष्ट्रातील जनमत धुव्रीकरणाच्या विरोधात आहे. मतदार मुद्द्यांवर आधारित राजकारणावर लक्ष केंद्रित करत आहे. विशेषतः शेती, रोजगार, महिला सुरक्षा, महागाई हे मुद्दे लोकांसाठी महत्वाचे आहेत.
फडणवीसांच्या विरोधात जनमतः महाराष्ट्रात भाजपला मोठ्या प्रमाणावर अँन्टीइन्कम्बन्सी म्हणजेच सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागत आहे. राज्यातील विविध मुद्द्यांसाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीसांना दोषी ठरवले जात आहे. एकनाथ शिंदे हे महायुतीचे सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत.
महाराष्ट्र विरुद्ध गुजरात भावनाः या निवडणुकीत महाराष्ट्र विरुद्ध गुजरात प्रतिस्पर्धा हा एक मोठा आणि महत्वाचा भावनिक मुद्दा ठरला आहे.
ओबीसी मतांत बदलः मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत ओबीसी मतदार मोठ्या संख्येने महायुतीकडे वळत चालला आहे. परंतु ओबीसी मतदारांतील अनेकांनी अन्य महत्वाच्या मुद्द्यांना प्राधान्य दिले आहे, त्यामुळे ओबीसी मतांचे महायुतीकडे एकत्रीकरण अशक्य आहे.
जातीय समीकरणेः मराठा मतदार मुख्यत्वे महाविकास आघाडीचे समर्थन करत आहे, ओबीसी मते अंशतः शेती संकटामुळे विभागलेली आहेत, अनुसूचित जातीचा मतदार महाविकास आघाडीच्या भोवती एकवटला आहे.
सोयाबीन-कापूस महायुतीला रवडणारः सोयाबीन आणि कापसासारख्या पिकांना मिळत असलेला कमी भाव ग्रामीण भागातील महत्वाचा मुद्दा आहे. ग्रामीण भागातील शेती समोरील गंभीर आव्हाने महायुतीच्या विरोधात जनमत तयार करत आहेत.
काँग्रेसचे बळकटीकरणः काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आणि भाजपला मुख्य पर्याय म्हणून उदयास येत आहे. परंतु काँग्रेसला आपली उपस्थिती दाखवून देण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
मविआचा प्रचार प्रभावीः महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या निवडणूक प्रचार मोहिमा आणि सभा कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मनोबल वाढवणाऱ्या ठरल्या आहेत.
आघाड्यांमधील दुबळे दुवेः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांमुळे महायुतीची मते कापली जात आहेत. अजित पवार हे महायुतीतील सर्वात दुबळा दुवा आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उबाठा)ला दुबळा दुवा म्हणून पाहिले जात आहे. महाविकास आघाडीची मदार काँग्रेसच्याच मुख्य मतांवर विसंबून आहे.
