मुंबईः विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आज दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आज सकाळीच आपली दुसरी उमेदवार यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता काँग्रेसचीही २३ उमेदवारांची दुसरी उमेदवार यादी आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात कामठी मतदारसंघात काँग्रेसने सुरेश भोयर यांना रिंगणात उतरवले आहे. काँग्रेसने माजी मंत्री सुनिल केदार यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी दिली आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात माजी शिक्षणअधिकारी मधुकर देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीतील जागावाटप आणि काँग्रेस पक्षाची रणनीती याबाबत शुक्रवारीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्यातील अन्य काँग्रेस नेत्यांसोबत नवी दिल्लीत बैठक झाली होती. त्यानंतर आज काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
कोणाला कुठे मिळाली संधी?
- भुसावळः राजेश मानवतकर
- जळगाव जामोदः स्वाती वाकेकर
- अकोटः महेश गणगणे
- वर्धाः शेखर शेंडे
- सावनेरः अनुजा केदार
- नागपूर दक्षिणः गिरीश पांडव
- कामठीः सुरेश भोयर
- भंडाराः पूजा तवेकर
- अर्जुनी मोरगावः दिलीप बनसोड
- आमगावः राजकुमार पुरम
- राळेगावः वसंत पुरके
- यवतमाळः अनिल मांगुळकर
- आर्णीः जितेंद्र मोघे
- उमरखेडः साहेबराव कांबळे
- जालनाः कैलास गोरंट्याल
- औरंगाबाद पूर्वः मधुकर देशमुख
- निलंगाः अभयकुमार साळुंके
- वसईः विजय पाटील
- कांदिवली पूर्वः कालू भडेलिया
- सायन कोळीवाडाः गणेशकुमार यादव
- श्रीरामपूरः हेमंत ओगले
- चारकोपः यशवंत सिंह
- शिरोळः गणपतराव पाटील
औरंगाबाद पूर्वमध्ये नवखा उमेदवार
औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात राजकारणाचा कुठलाही अनुभव नसलेला नवखा उमेदवार काँग्रेसने मैदानात उतरवला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण अधिकारी मधुकर देशमुख यांना येथून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी डॉ. गफार कादरी इच्छूक होते, अशी चर्चा होती. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचेही सांगण्यात येत होते. राजेश मुंडे यांनीही उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली होती आणि शुक्रवारीच उमेदवारी अर्जही भरला होता. परंतु काँग्रेसने मधुकर देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. देशमुख हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत.
श्रीरामपुरात विद्यमान आमदाराचा पत्ता कट
काँग्रेसने धक्कातंत्राचा वापर करत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार लहू कानडे यांचा पत्ता कट केला आहे. त्यांच्याऐवजी हेमंत ओगले यांना तिकिट देण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून श्रीरामपूर काँग्रेसमधील एक मोटा गट विद्यमान आमदार लहू कानडे यांच्या विरोधात सक्रीय झाला होता. हेमंत ओगले यांनी श्रीरामपुरातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आज जाहीर झालेल्या उमेदवार यादीत हेमंत ओगलेंना तिकिट देण्यात आले आहे.