…तर अमित शाह महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करतीलः संजय राऊतांचा गंभीर आरोप


मुंबईः महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करावे लागणार आहे. आघाडीच्या राजकारणात सरकार स्थापन करण्यासाठी केवळ ४८ तास मिळतील. ४८ तासांत सरकार स्थापन झाले नाही तर अमित शाह महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करतील, असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. घाईघाईने निवडणूक घेऊन भाजप आपले मनसुबे पूर्ण करत आहे, असा आरोपही राऊत यांनी ‘सामना’मधील ‘रोखठोक’ सदरात केला आहे.

‘निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीचे काम २४ नोव्हेंबरपर्यंत चालेल. म्हणजेच २४ ते २६ नोव्हेंबर असा ४८ तासांचा वेळ नवीन सरकार बनवण्यासाठी मिळणार आहे. पण हा वेळ पुरेसा नाही. ४८ तासांत सरकार स्थापन करून शपथविधी करावा लागेल. आमदारांच्या बैठका घेऊन नेता निवडीचे सोपस्कार पार पाडावे लागतील. निकालानंतरच्या ४८ तासांत हे घडले नाही तर विधानसभेचा कालावधी संपणार आणि नवीन विधानसभा अस्तित्वात आली नाही म्हणून राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची शिफारस राज्यपाल करतील,’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

…हे भाजपचे षडयंत्र

‘महाराष्ट्रात घाईघाईने निवडणुका घेऊन भाजप आपले मनसुबे पूर्ण करत आहे. अमित शाह व महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना आपण महाराष्ट्र गमावू याविषयी खात्री पटली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी जिंकली तरी त्यंना सरकार स्थापनेस पुरेसा वेळ मिळू नये. त्यानंतर सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती शासन लावून राज्य करायचे असा एकंदिरत डाव दिसतो,’ असेही त्यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने जाणूनबुजून कमी वेळ दिला

‘निवडणुकांना ३५ दिवसांचाच अवधी मिळाला आहे व निवडणूक आयोगाने हे सर्व जाणूनबुजून केले. महाराष्ट्रात एक पूर्णपणे बेकायदा सरकार निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट व देशाचे प्रधानमंत्री तसेच गृहमंत्र्यांच्या संगनमताने चालले. त्यातील मुख्य पात्र असलेले देशाचे सरन्यायाधीश १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या काळात त्यांनी शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस कोणाचाही निर्णय दिला नाही. कायदा व घटनेचा हा सरळ लिलाव आहे,’ अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!