मुंबईः एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अशा ट्रिपल इंजिनची मोट बांधून महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवण्याच्या भाजपच्या मनसुब्यांना मोठा सुरुंग लागण्याची शक्यता दिसू लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल, असा दावा एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे. महाविकास आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत ४० ते ४५ जागा जिंकेल असा दावा काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात करण्यात आला आहे. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष पाहता भाजपसाठी आगामी लोकसभा निवडणूक जिंकणे किती अवघड होऊ शकते, याचा अंदाज बांधता येऊ शकतो.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस या जोडगोळीचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर काही महिन्यांतच अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महाराष्ट्रात एक अंतर्गत सर्वेक्षण केले. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघात जाऊन ग्राऊंड रिऍलिटीचा आढावा या सर्वेक्षणात घेण्यात आल. काँग्रेसच्या या अंतर्गत सर्वेक्षणात भाजपची चिंता वाढवणारे आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आले आहेत.
काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला आगामी लोकसभा निवडणुकीत तब्बल ४० ते ४५ जागांवर विजय मिळेल, असा निष्कर्ष काँग्रेसच्या या अंतर्गत सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. हे निष्कर्ष केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपसाठी धक्कादायक आहेत.
‘ हे सर्वेक्षण करताना महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघात जाऊन तेथील सद्यस्थितीतील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये तयारी सुरू केली आहे. राज्यातील सर्व भाजपविरोधी पक्षांशी आम्ही युती करू. आम्हाला भाजपला सर्व पातळ्यांवर उखडून फेकायचे आहे,’ असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्वेक्षणाबाबत बोलताना सांगितले.
आमच्यात नव्हे, शरद पवारांबद्दल जनतेत संभ्रम
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीबद्दल विचारले असता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शरद पवारांबद्दल काँग्रेसमध्ये संभ्रम नाही, तर जनतेत संभ्रम आहे. शरद पवार हे मोठे नेत आहेत. निर्णय घेण्यात ते सक्षम आहेत. या भेटीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘इंडिया’ आघाडीसोबतच राहणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केलेले आहे. या सर्व परिस्थितीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लक्ष ठेवून आहेत. मुंबईतील ‘ इंडिया’ आघाडीच्या बैठकीच्या वेळी याबाबत ते शरद पवारांशी चर्चा करतील, असे नाना पटोले म्हणाले.
एबीपी न्यूजच्या सर्वेक्षणात ‘इंडिया’ला ६५ टक्के मते
दरम्यान, केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपविरोधात देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली आहे. या ‘इंडिया’ आघाडीला देशातील जनतेकडून कसा प्रतिसाद मिळेल, याबाबत एबीपी न्यूजने केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. या सर्वेक्षणानुसार देशातील तब्बल ६५ टक्के मतदारांनी ‘इंडिया’ आघाडीला पसंती दिली आहे तर केवळ ३५ टक्के मतदारांनीच भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला पसंती दिली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे अंतर्गत सर्वेक्षणाचे निष्कर्ष आणि एबीपी न्यूजने केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष पाहता आगामी लोकसभा निवडणूक भाजपसाठी म्हणावी तेवढी सोपी नाही, असेच एकूण चित्र सध्या तरी दिसू लागले आहे.