छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): शहरपोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एमआयडीसी सिडको, पुंडलिकनगर, मुकुंदवाडी आणि सातारा या चार पोलिस ठाण्याच्या हद्दीत लेझर लाईट्स व बीम लाईट्स वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
या चार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व फार्म हाऊसेस, मंगल कार्यालये, विवाह सोहळा, सामाजिक कार्यक्रम आस्थपनांच्या मालकांना, आयोजकांना लेझर लाईट्स, बीम लाईट्स वापरण्यावरील बंदी आदेशाचे पालन करावे लागणार आहे. हे निर्बंध ४ ऑक्टोबरपर्यंत लागू राहतील, असे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
लेझर लाईट्स आणि बीम लाईट्स यामुळे पायलटच्या लक्ष्य विचलित होऊन हवाई वाहतूक दुर्घटना होऊ शकते आणि विमान प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे हे आपत्ती प्रतिबंधात्मक आदेश पोलीस आयुक्तांनी जारी केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या फार्म हाऊस मंगल कार्यालय, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजक मालक यांच्यावर भारतीय दंड विधान संहतिचे कलम १८८ अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असून असे उल्लंघन करणारे शिक्षेस पात्र राहतील, असे आदेशाद्वारे सूचित करण्यात आले.
या प्रतिबंधात्मक आदेशास सर्व पोलिस ठाणे, सर्व पोलीस अधिकारी कार्यालय, छावणी मंडळ, महानगरपालिका बसस्थानक, मुख्य बाजारपेठा सार्वजनिक वाचनालये इत्यादी महत्त्वाचे ठिकाणी सदरील आदेशा फलकावर चिटकूवन माहिती प्रदर्शित करण्याचे आदेशही पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.
हवाई वाहतूक सुरक्षिततेसाठी जारी करण्यात आलेले हे आदेश ६ ऑगस्टपासून ४ ऑक्टोबरपर्यंत शहरात लागू राहतील. असे आदेश पोलीस आयुक्त मनोज लोहीया यांनी निर्गमित केले आहे.