नागपूरः नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात आंतरवासिता विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची रॅगिंग घेतल्याचा धक्कादायक प्रकार व्हायरल झालेल्या एका चित्रफितीतून उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून याबाबत केंद्रीय रॅगिंग प्रतिबंधक समितीकडून मेडिकल प्रशासनाकडे तक्रार येताच सहा आंतरवासिता विद्यार्थ्यांवर तडकाफडकी कारवाई करण्यात आली आहे. या सहा विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय रॅगिंग प्रतिबंधक समितीकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाला एक चित्रफित ई-मेलद्वारे प्राप्त झाली होती. मेडिकलचे सहा इंटर्न प्रथम वर्षाच्या एका विद्यार्थ्याची रॅगिंग घेत असल्याचे या चित्रफितीत दिसत आहे. ही चित्रफित प्राप्त होताच मेडिकल प्रशासनाने तातडीची बैठक घेऊन चौकशी केली. चौकशीत हे सहा इंटर्न प्रथम वर्षाच्या एका विद्यार्थ्याची रॅगिंग घेत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने तडकाफडकी कारवाई केली आहे.
इंटर्नशिप करणारे सहा विद्यार्थी एमबीबीएस प्रथम वर्षाच्या एका विद्यार्थ्याची रॅगिंग घेत त्याला झापड मारत असल्याचे या चित्रफितीत दिसून आले. समितीने रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्याला विश्वासात घेतले. त्याने रॅगिंग झाल्याची कबुली देताच त्याच्याकडून तक्रार लिहून घेण्यात आली. तक्रार प्राप्त होताच रॅगिंग घेणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना तीन तासांत वसतिगृह सोडण्याचे आदेश देण्यात आले.
रॅगिंग घेणाऱ्या सहा इंटर्न म्हणजेच आंतरवासिता डॉक्टर्सची इंटर्नशिप रद्द करून त्यांना वसतिगृहाबाहेर हाकलण्यात आले आहे. या सहाही आंतरवासिता विद्यार्थ्यांच्या विरोधात प्रशासनाच्या वतीने तक्रारही देण्यात आली आहे. एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण करून झाल्यावर शासकीय रूग्णालयात एक वर्ष रुग्णसेवा देण्याला इंटर्नशिप म्हटले जाते.