पॅरिसः पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवल्यामुळे निराश झालेल्या विनेश फोगटने दुसऱ्याच दिवशी गुरूवारी सकाळी कुस्तीमधून संन्यासाची घोषणा केली आहे. एक्सवर एक पोस्ट करून विनेश फोगटने निवृत्तीची घोषणा केली आहे.
‘मां कुश्ती मुझसे जीत गई, मैं हार गई… आपके सपने और मेरी हिम्मत टूट गई हैI अब मेरे पास और ताकद नहीं हैI अलविदा कुश्ती २००१-२००४ I मैं हमेशा आप सभी की ऋणी रहूंगीI कृपया मुझे माफ कर दीजिएI’, असे विनेशने म्हटले आहे.
विनेश फोगटला बुधवारी सकाळी वजन जास्त भरल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आले आणि तिच्या ऐतिहासिक गोल्ड मेडल सामन्याच्या काही तास आधीच तिचे मेडल हिसकावून घेण्यात आले. विनेश फोगटचे वजन अवघे १०० ग्रॅम जास्त भरल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले होते. विनेश फोगट यामुळे निराश झाली. त्यानंतर आज गुरूवारी तिने कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
२९ वर्षीय विनेश फोगट ऑलिम्पिक स्पर्धेत फायनलमध्ये पोहोचणारी आणि महिलांच्या ५० किलोग्रॅम वजनी गटात किमान रौप्य पदक निश्चित करणारी पहिली भारतीय महिला पहिलवान बनली होती. परंतु परिस्थितीने तिला साथ दिली नाही. तिचे प्रशिक्षक, सहयोगी कर्मचारी आणि भारतीय ऑलिम्पिक संघाने प्रयत्न करूनही तिला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे विनेश फोगटला एवढा धक्का बसला की तिला डिहायड्रेशन झाले आणि खेल ग्राममधील एका पॉलिक्लिनिकमध्ये भरती करावे लागले.
विनेशच्या या निर्णयामुळे क्रीडा विश्वाला धक्का बसला असून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा महापूर सुरू झाला आहे. विनेश तू, देशाची गोल्डन गर्ल आहेस, निवृत्तीचा निर्णय मागे घे, असे आवाहन तिला केले जात आहे.